८७ वर्षांच्या डॉक्टरांची ४६ लाखांची फसवणूक
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी : डिजिटल अरेस्टची दाखवली भीती
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ डॉक्टरांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका ८७ वर्षीय डॉक्टरांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टर हे डेक्कन जिमखाना भागात राहतात. सायबर चोरट्यांनी २४ मे रोजी तक्रारदार डॉक्टरांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी त्यांनी केली. मुंबई पोलिसांनी तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे, अशी भीती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखवली.
त्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याचे सांगून अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे चोरट्यांनी सांगितले. घाबरलेल्या डॉक्टरांनी चोरट्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ४६ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.
केवायसी अपडेटच्या नावाखाली ज्येष्ठाची फसवणूक
बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची ४ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ५९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे बाणेर परिसरात राहतात. रविवारी (३१ मे) सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. सारस्वत बँकेचे अधिकारी बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. बँक खात्याची माहिती अद्ययावत करायची आहे, असे सांगून चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली.
त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवली. ही लिंक उघडल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख १० हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग केली. पोलीस निरीक्षक विजय खिलारे तपास करत आहेत.
