आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भाजपकडून राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेची उमेदवारी; राजकीय वनवासाचा झाला अंत

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 1, 2026
Spread the love

सोलापूर : सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीयदृष्ट्या काहीसे प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागलेल्या राजेंद्र राऊत यांचा अखेर राजकीय वनवास संपल्याची भावना त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. पक्षासाठी केलेले सातत्यपूर्ण योगदान, कठीण काळात घेतलेल्या ठाम भूमिका, संघटन विस्तारासाठी केलेले प्रयत्न आणि विकासकामांचा भक्कम ठसा यामुळे भाजपने त्यांच्यावर पुन्हा एकदा मोठा विश्वास दाखवला आहे.

राजेंद्र राऊत हे केवळ बार्शी तालुक्यापुरते मर्यादित न राहता सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रभावी राजकीय पकड असलेले भाजपचे नेते म्हणून ओळखले जातात.

कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणारे, पक्ष संघटना वाढविण्यासाठी झटणारे आणि कोणतीही जबाबदारी स्वीकारून ती यशस्वीपणे पूर्ण करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना भाजप आणि राज्य सरकारची भूमिका ठामपणे मांडणाऱ्या नेत्यांमध्ये राजेंद्र राऊत यांचे नाव विशेष चर्चेत राहिले.

अनेक संवेदनशील विषयांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. पक्ष अडचणीत असताना पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्याची त्यांची क्षमता राज्य नेतृत्वाच्या विशेष लक्षात राहिल्याचे बोलले जाते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांचे नेतृत्व आणि निवडणूक व्यवस्थापन कौशल्य प्रकर्षाने दिसून आले. कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी नगरपरिषद, जिल्हा परिषद तसेच विविध स्थानिक संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

निवडणुकांचे सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करणे आणि विरोधकांना प्रभावी उत्तर देणे या बाबींमध्ये त्यांची कार्यशैली नेहमीच वेगळी राहिली आहे.

सोलापूर जिल्ह्यात भाजपमधील विविध नेत्यांमधील मतभेद दूर करून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. जिल्ह्यातील विविध राजकीय समीकरणे सांभाळत पक्षाला बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.

रश्मी बागल यांच्यासह त्यांच्या हजारो समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणण्यात राजेंद्र राऊत यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते.

यानंतर जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. याशिवाय अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घडवून आणत त्यांनी भाजपचा जनाधार वाढविला.

राजेंद्र राऊत यांची आणखी एक मोठी ताकद म्हणजे सोलापूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांमधील त्यांचा प्रभाव. दोन्ही जिल्ह्यांतील स्थानिक राजकारण, कार्यकर्ते आणि जनतेशी असलेला त्यांचा संपर्क भाजपसाठी नेहमीच फायदेशीर ठरला आहे.

त्यामुळेच या दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रभाव असलेले भाजपचे प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बार्शी तालुक्याच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक सुविधा, विविध विकासकामे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

त्यामुळे विकासाभिमुख नेता म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीतही सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली होती.

अंतिम निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नसला तरी त्यांच्या संघटन क्षमतेची, जनसंपर्काची आणि कार्यकर्त्यांवरील प्रभावाची प्रचिती त्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आली. निवडणूक व्यवस्थापनातील त्यांची भूमिका पक्ष नेतृत्वाच्या विशेष लक्षात राहिल्याचे मानले जाते.

विशेष म्हणजे, राजेंद्र राऊत पुन्हा आमदार व्हावेत ही केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांचीच इच्छा नसून संपूर्ण बार्शी तालुक्याची भावना असल्याचे मागील काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील निकालांमधून स्पष्टपणे दिसून आले आहे.

विविध निवडणुकांमध्ये मतदारांनी दिलेला कौल आणि भाजपला मिळालेले यश हे राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक मानले जाते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र राऊत यांनी पक्ष, कार्यकर्ते आणि विकासकामे या तिन्ही आघाड्यांवर सातत्याने काम केले आहे.

स्पष्ट भूमिका, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता, पक्षनिष्ठा आणि विकासासाठीची बांधिलकी यामुळेच भाजपने त्यांच्यावर विधान परिषदेच्या उमेदवारीची जबाबदारी सोपवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सोलापूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील भाजपची ताकद आणि राजेंद्र राऊत यांचे संघटन कौशल्य लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासात पक्षासाठी केलेल्या योगदानाची ही मोठी पोचपावती मानली जात असून, आता विधान भवनात सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राजेंद्र राऊत सज्ज झाले आहेत.

भाजपने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास हा केवळ एका नेत्याचा सन्मान नसून बार्शी तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा गौरव मानला जात आहे.