आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुणे रेल्वे स्थानकातून बालिकेचे अपहरण करणारे तिघे जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 1, 2026
Spread the love

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून एका वर्षाच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. बालिकेची १६ तासांच्या आत सुखरूप सुटका करण्यात आली.

द्रुपदा लक्ष्मण गायकवाड (वय ३५), राधा लकी आदिवासी (वय २०) आणि लकी संदीप आदिवासी (वय २१, तिघे रा. सुंदरनगर, जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालिका आणि तिचे आई-वडील ३० मे रोजी पुणे स्टेशन परिसरातील श्री दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत झोपले होते. बालिकेची आई झोपेत असताना आरोपींनी तिच्या शेजारी झोपलेल्या बालिकेचे अपहरण केले. बालिका जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.

स्टेशन परिसरातील ६५ ठिकाणांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. चित्रीकरणात एक महिला आणि तिच्यासोबत असलेले दोन साथीदार फलाट क्रमांक चार परिसरातून पनवेल-नांदेड रेल्वेतून बालिकेला घेऊन गेल्याचे दिसून आले.

त्यानंतर पुणे स्टेशन परिसरातून नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची तपासणी सुरू करण्यात आली. लोहमार्ग पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आल्या. पोलिसांची पथके कुर्डुवाडी, बार्शी, सोलापूर, लातूर आणि दौंड परिसरात रवाना करण्यात आली. पुणे पोलिसांबरोबर रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीसही अपहरणकर्त्यांचा शोध घेऊ लागले.

पनवेल ते नांदेड या रेल्वेतील रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी गाडीत तपासणी केली. त्यात एका महिलेकडे एक वर्षाचे बाळ असल्याचे दिसून आले. गाडी दौंड रेल्वे स्थानकात थांबल्यानंतर हे तिघेही गाडीतून खाली उतरले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून बालिकेची सुखरूप सुटका करण्यात आली.

आरोपी हे मूळचे जालना येथील रहिवासी असून सध्या दौंड रेल्वे स्थानक परिसरात राहतात. ते फिरस्ते असून कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून ते पुण्यात परत आले होते. राधा आदिवासी हिच्या शरीराचा अर्धा भाग आगीत भाजला असल्याने तिला मूल होऊ शकत नाही. महिलेच्या कुशीत झोपलेले बाळ पाहून त्यांनी तिचे अपहरण केले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक संदीपान पवार, संतोष पांढरे, भगवान ईप्पर, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौगुले, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम आणि त्यांच्या पथकाने केली.