आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 1, 2026
Spread the love

पुणे : प्रेमप्रकरणातून एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना वारजे माळवाडी परिसरात घडली. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मृत तरुणीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राज ठोंबरे (वय २३, रा. कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचे आरोपी तरुणासोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

दरम्यान, आरोपीने दुसऱ्या एका तरुणीशी मैत्री केली होती. त्यानंतर तो संबंधित तरुणीला टाळू लागला. याबाबत तरुणीने त्याला जाब विचारला असता, त्याने तिच्याशी वारंवार भांडणे करून मानसिक त्रास दिला.

या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीने ४ मे रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मात्र, तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी राज ठोंबरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भांबेरे करत आहेत.

दरम्यान, सहकारनगर परिसरातही प्रेमप्रकरणातून एका अल्पवयीन युवतीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचे आमिष दाखविले होते. मात्र, विवाहास नकार दिल्यानंतर युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.