मालकाला लुटणाऱ्या कामगारासह पाच जणांना अटक
डोळ्यात स्प्रे मारून २५ लाखांची लूट; धनकवडीतील गुन्हा सहकारनगर पोलिसांनी उघडकीस आणला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : परकीय चलन विनिमय व्यवसायातील २५ लाख रुपये आणि परकीय चलन असलेली बॅग लुटणाऱ्या टोळीचा सहकारनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २४ लाख ३० हजार रुपये रोख आणि सुमारे ९० हजार रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे करण भगवान कोंढाळकर, यश भगवान कोंढाळकर (दोघे रा. ओमसाई अपार्टमेंट, गजानन कॉलनी, आंबेगाव पठार), युवराज गणेश वैराट (रा. मल्हार मार्तंड सोसायटी, पद्मावती), ऋतुराज शिवाजी गोरे (वय २१, रा. गजानन कॉलनी, आंबेगाव पठार) आणि जुनेद जमिल शेख (वय १९, रा. दत्तनगर, कात्रज) अशी आहेत.
याप्रकरणी अनिकेत मानकु कदम (वय ४७, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कदम यांचा गुलटेकडी येथे ‘आर्या फॉरेक्स’ नावाने परकीय चलन विनिमय व्यवसाय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार व शनिवारी जमा झालेली २५ लाख रुपयांची रोकड तसेच मलेशियन रिंगिट आणि दुबई दिरहम चलन घेऊन अनिकेत कदम हे सोमवारी (२५ मे) सकाळी साडेनऊच्या सुमारास बँकेत जात होते.
त्यावेळी धनकवडी टपाल कार्यालयाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर स्प्रे मारला व दुचाकीला लावलेली पैशांची बॅग चोरून नेली.
घटनेनंतर सहकारनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आंबेगाव पठार परिसरातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत फिर्यादींच्या कार्यालयात काम करणारा युवराज वैराट आणि त्याचा मित्र ऋतुराज गोरे यांनी कट रचून गुन्हा केल्याचे उघड झाले.
ही कारवाई पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार, पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे तसेच पोलीस हवालदार शिवतरे, पोलीस अंमलदार सुतकर, भगत, बागलाने, येनपूरे, अतुल पवार आणि नलवाड यांच्या पथकाने केली.
कामगारानेच पुरवली माहिती – पोलिसांच्या तपासात फिर्यादी अनिकेत कदम यांच्या हालचाली, बँकेत पैसे नेण्याची वेळ आणि त्यांच्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती आरोपींकडे आधीपासून असल्याचे स्पष्ट झाले. कार्यालयात काम करणाऱ्या युवराज वैराटने ही माहिती साथीदारांना पुरवली होती. त्यानंतर सर्वांनी संगनमत करून लुटीचा कट रचला आणि गुन्हा अंजाम दिला. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २४ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे ९० हजार रुपयांचे परकीय चलन जप्त केले आहे.
