९ वर्षांपासून फरारी गुंड जेरबंद
अपहरण व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात होता फरार : गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर परिसरात ९ वर्षांपूर्वी एका तरुणाचे अपहरण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. संबंधित आरोपी २०१७ पासून पोलिसांना गुंगारा देत होता.
अमर बबन घाडगे (वय २९, रा. दीपकनगर, गोपाळपट्टी, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने अमोल आडेगावकर, मारुती गवळी व इतर साथीदारांसह एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर वार करत खुनाचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी २०१७ मध्ये अपहरण व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमर घाडगेच्या साथीदारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र, अमर तेव्हापासून फरार होता.
शहरात ३० मे रोजी राबविण्यात आलेल्या कोम्बिंग व राऊंड-अप ऑपरेशन दरम्यान पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे पथक गुन्हेगारांची माहिती गोळा करत होते.
त्यावेळी पोलीस अंमलदार समीर पांडुळे व गणेश माने यांना त्यांच्या बातमीदारामार्फत अमर घाडगे हा लक्ष्मी कॉलनी परिसरात उभा असल्याची माहिती मिळाली. त्याच्या हातावर ‘Payal’ (पायल) असे गोंदलेले असल्याचेही बातमीदाराने सांगितले.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अमर घाडगे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्याला हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या पथकात पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, सतीश वनवे, समीर पांडुळे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, उमेश शेलार आणि अनिल जामगे यांचा समावेश होता.
