आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

व्हिडिओ पाठवून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 2, 2026
Spread the love

पुणे : गेली चार वर्षे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणाने आत्महत्येपूर्वी आपल्या भाऊ व नातेवाईकांना व्हिडिओ पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरात उघडकीस आली आहे. मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पैसे उकळणे आणि मानसिक त्रास दिल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी संबंधित महिलेसह तिचा पहिला पती, बहिण आणि भावाला अटक केली असून, दुसऱ्या पतीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण बाळासाहेब कांबळे (वय २८, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी, मूळ रा. खरबा, ता. मानवत, जि. परभणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे प्रीती अनिकेत बोढर्डे उर्फ रमिसा उर्फ माही उर्फ प्रीती सुधीर रणदिवे (वय ३१, रा. थिटे वस्ती, खराडी), अनिकेत बोढर्डे (वय ४१, रा. जेधेनगर, बिबवेवाडी), संस्कृती सुधीर रणदिवे (वय २५) आणि ऋतिक सुधीर रणदिवे (वय २६, दोघे रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी आहेत. तर अक्षय मुरलीधर निकम (वय ४०, रा. जेल रोड, नाशिक) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत करण याचा भाऊ कृष्णा बाळासाहेब कांबळे (वय ३४, सध्या रा. थिटे वस्ती, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण कांबळे हा आपल्या भावाच्या वॉशिंग सेंटरमध्ये काम करत होता. तसेच तो अधूनमधून रिक्षाही चालवत होता. प्रीती रणदिवे हिचे यापूर्वी दोन विवाह झाले होते. पतींसोबत मतभेद झाल्याने ती वेगळी राहत होती. दरम्यान, तिची आणि करणची ओळख झाली आणि गेल्या चार वर्षांपासून ते लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते.

या काळात प्रीतीचे दोन्ही पती, तिची बहिण आणि भाऊ यांचा त्यांच्याकडे वारंवार वावर होता. फिर्यादीनुसार, प्रीती व तिच्या नातेवाईकांनी करण याला प्रीतीच्या मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्याच्याकडून पैसे उकळून त्याला मानसिक त्रास दिला जात होता.

या सततच्या त्रासाला कंटाळून करण कांबळे याने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तींच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने नमूद केले होते. हा व्हिडिओ त्याने १ जून रोजी आपल्या भाऊ व इतर नातेवाईकांना पाठविला.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. त्याच दिवशी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास खराडी येथील केशवनगर पुलाखाली नदीपात्रालगत एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृत व्यक्ती करण कांबळे असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहेत.