चारित्र्याच्या संशयावरून तरुणीचा गळा दाबून केला खुन
घराला कुलूप लावून गेला पळून : वाघोली पोलिसांनी परभणीवरुन केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत असताना चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने तरुणीचा गळा दाबून खून केला. घराला बाहेरून कुलूप लावून तो पळून गेला. दोन-तीन दिवसांनी दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. वाघोली पोलिसांनी तरुणाला परभणीहून अटक केली आहे.
रिहाना खातून (वय २६, रा. शिवअस्मी बिल्डिंग, आव्हाळवाडी रोड, वाघोली, मूळ रा. मेदिनापूर, पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी रवी समीर वैराळ (वय २७, रा. परभणी) याला अटक केली आहे. याबाबत रिहानाचे नातेवाईक इमरान राजेसाहेब बोदलेखान (वय ३१, रा. आदर्शनगर, लोहगाव) यांनी वाघोली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
ही घटना २८ ते ३१ मे दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी वैराळ हा प्लंबिंगचे काम करतो. तो व रिहाना खातून हे गेल्या दीड वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये चऱ्होली येथे राहत होते.
मात्र, रवी वैराळ याला रिहानाच्या चारित्र्याचा संशय होता. यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. चऱ्होलीहून ते १५ दिवसांपूर्वी वाघोली येथील शिवअस्मी बिल्डिंगमध्ये राहायला आले होते.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांच्या घराला कुलूप होते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने १ जून रोजी नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा आत तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रिहाना व रवी वैराळ हे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली.
रिहाना व रवी वैराळ यांचे मोबाईल बंद लागत होते. तांत्रिक विश्लेषणातून रवी वैराळ हा परभणी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता, रिहानाच्या चारित्र्याविषयी रवी याला संशय होता. त्यातून त्यांच्यात भांडणे होत होती.
‘‘तू मला सोडून दे, नाहीतर मुलांना बोलावून तुला मारेन,’’ अशी धमकी रिहाना देत होती. त्यातून तिचा गळा दाबून खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
