आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

त्रिमूर्ती पान शॉपवर निर्भया पथकाचा छापा; प्रतिबंधित गुटखा जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 2, 2026
Spread the love

बार्शी : सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग तसेच अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी श्रीमती अंजना कृष्णा यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली, तसेच निर्भया पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथकाने बार्शी शहरातील त्रिमूर्ती पान शॉपवर छापा टाकून प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला.

या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३७/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(ii), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a) व ५९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी रामानंद उमाशंकर स्वामी, अन्न व औषध प्रशासन अधिकारी हे आहेत. तर संकेत भगवान लांडगे (वय ३२, रा. सुभाष नगर, बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास श्रीमती अंजना कृष्णा यांना गोपनीय माहिती मिळाली की, आगळगाव रोडवरील हिरेमठ हॉस्पिटलजवळ असलेल्या त्रिमूर्ती पान शॉप येथे प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची बेकायदेशीर विक्री सुरू आहे. त्यानुसार निर्भया पथकाने तातडीने छापा टाकला.

या कारवाईत महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप, पोहेकॉ बाबासाहेब घाडगे, पोकॉ हनुमंत पाडुळे, मपोको नम्रता गटकुळ आणि चालक पोकॉ भाऊसाहेब महानोर यांनी सहभाग घेतला. छाप्यामध्ये दुकानातून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा १३ हजार ३८२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

जप्त मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधण्यात आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी रामानंद उमाशंकर स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई श्रीमती अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्भया पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ बाबासाहेब घाडगे, पोकॉ हनुमंत पाडुळे, मपोको नम्रता गटकुळ आणि चालक पोकॉ भाऊसाहेब महानोर यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पोफळे करीत आहेत.