महिलेला भीती घालून अघोरी पूजा करणाऱ्या मांत्रिक बाबावर गुन्हा दाखल
तुला वेड लागले, मुलगा फाशी घेण्याची दाखविली होती भिती : खर्च करायला लावून फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : यूट्यूबवर मंत्रशक्तीद्वारे मानसिक आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या मांत्रिक बाबाने एका महिलेला तुझ्यावर करणीबाधा, भूतबाधा व तंत्रविद्येची बाधा झाली आहे. त्यासाठी अघोरी पूजा न केल्यास तू दगड मारत फिरशील, तुझा मुलगा फाशी घेईल, अशी भीती दाखवून उज्जैन, जेजुरी, नाशिक आणि कोलकाता येथे अघोरी पूजा करून घेत फसवणूक केली. सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या या मांत्रिक बाबा व त्याच्या पत्नीविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.‘
कमलेश शिवकुमार अधिकारी व त्याची पत्नी गौरी कमलेश अधिकारी (रा. गोकुळधाम, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका ५३ वर्षीय महिलेने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती रेल्वेत गँगमन होते.
निवृत्तीनंतर ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तीन वर्षांपूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये फिर्यादींना शारीरिक व मानसिक आजाराचा त्रास होत होता.
त्यांनी व त्यांच्या मुलाने मिळून यूट्यूबवर मानसिक आजारावरील उपचारांबाबत शोध घेत असताना त्यांना कमलेश शिवकुमार अधिकारी व गौरी अधिकारी यांचा व्हिडिओ मिळाला.
त्यांनी अनेक मानसिक आजारी लोकांचा आजार मंत्र-तंत्र व विविध विधींच्या माध्यमातून बरा केल्याचा दावा केला होता. त्यांच्याशी संपर्क झाल्यानंतर कमलेश व त्याची पत्नी गौरी अधिकारी हे फिर्यादींच्या घरी आले.
त्यांनी सायंकाळी ६ ते पहाटे २ वाजेपर्यंत पूजा केली. त्या पूजेचा खर्च म्हणून त्यांनी फिर्यादींकडून २ लाख रुपये घेतले. फिर्यादींनी स्वतःचे गंठण गहाण ठेवून अधिकारी याला पैसे दिले.
कमलेश याने, “तुम्ही पूजा केली म्हणून बऱ्या झालात, नाहीतर तुम्ही दगड मारत फिरला असता, तुमच्या मुलाने फाशी घेतली असती,” असे सांगून भीती दाखविली.
त्यानंतर त्याने उज्जैन येथे स्मशानभूमीत पूजा करावी लागेल, असे सांगून त्यांना तेथे नेले. तेथे इतर लोकांनादेखील त्याने बोलावून घेतले होते.
अनेकांना त्याने एकाच हॉटेलमध्ये उतरवले होते. साधारण आठ दिवस तो ज्या-ज्यांना त्रास होत होता, त्या सर्वांना रात्री १२ ते पहाटे ३ वाजेपर्यंत स्मशानभूमीत घेऊन जात होता.
त्या ठिकाणी जाळलेल्या मृतदेहाच्या राखेवर तो अघोरी पूजा करत होता. या अघोरी पूजेच्या खर्चापोटी त्याने त्यांच्याकडून ६० हजार रुपये घेतले. उज्जैन येथील सर्व खर्चही फिर्यादींनीच केला.
त्यानंतर शिवरात्रीला एक विधी करायचा आहे, असे सांगून तो सर्वांना पुन्हा उज्जैनला घेऊन गेला. तेथे शिवरात्रीच्या आदल्या दिवशी आलेल्या सर्व लोकांना बोलावून तो व त्याची पत्नी गौरी हे शंकर-पार्वतीचा अवतार असल्याचे सांगत होते.
शिवरात्रीच्या पहाटे ४ वाजता त्याने स्वतःचे लग्न लावून घेतले. त्यानंतर होमविधी करून घेत त्यासाठी फिर्यादींकडून ५० हजार रुपये घेतले. यानंतर ते जेजुरीला आले.
तेथे कोंबडी व पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. सत्यनारायण पूजा करण्यासाठी त्यांना नाशिकला नेण्यात आले. तसेच कोलकाता येथेही नेऊन अघोरी पूजा करण्यात आली. त्यासाठी ते विमानाने गेले होते.
त्या प्रवासासह सर्व खर्च फिर्यादींकडूनच करून घेण्यात आला. अघोरी पूजा व विविध विधींमुळे कोणताही फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत असल्याने त्यांनी कमलेश अधिकारी व गौरी अधिकारी यांचे फोन घेणे बंद केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
अनेकांची फसवणूक केल्याचे उघड – अघोरी पूजा करूनही काहीच फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी त्यांच्याशी संपर्क बंद केला. काही दिवसांपूर्वी कमलेश व गौरी अधिकारी यांनी लोकांची केलेली फसवणूक यासंदर्भातील विविध बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. त्या पाहिल्यानंतर फसवणूक झालेल्या लोकांनी एकमेकांशी संपर्क साधून माहितीची देवाणघेवाण केली. कमलेश व गौरी अधिकारी यांच्याविरोधात नाशिक येथेही गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला असता त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार लोहगाव पोलीस ठाण्यात या दोघांनी ३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
