हुंड्यासाठी छळ केल्याने तरुणीची आत्महत्या
प्रेमविवाह केला होता : पती, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्रेमविवाह केल्यानंतर हुंड्यासाठी छळ केल्याने २० वर्षीय तरुणीने फिनेल पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू व नणंदेविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंकिता रवींद्रनाथ काळे (वय २०, रा. डीमार्टजवळ, संतोषनगर, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
याबाबत तरुणीच्या आईने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती अजित दशरथ पवार (वय २५), सासू अनुसया दशरथ पवार (वय ५५) आणि नणंद अलका लहू जाधव (वय ३०, सर्व रा. संतोषनगर, कात्रज, मूळ रा. कारेपूर, ता. रेणापूर, जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना पुणे व लातूर येथे ७ जून २०२५ ते १३ मे २०२६ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे मूळचे लातूर जिल्ह्यातील असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत.
फिर्यादीची मुलगी अंकिता हिने वर्षभरापूर्वी अजित पवार याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर पती, सासू व नणंद यांनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. माहेरहून दागिने घेऊन येण्याची मागणी त्यांनी केली होती.
हा छळ असह्य झाल्याने अंकिता हिने १३ मे २०२६ रोजी फिनेल पिऊन आत्महत्या केली. मुलीचा हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण डोईफोडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
