रुग्ण महिलेच्या दागिन्यांची चोरी
जहांगीर हॉस्पिटलमधील घटना : हॉस्पिटल कर्मचारी बनून आला चोरटा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बंडगार्डन रस्त्यावरील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या महिलेचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका रुग्ण महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४० वर्षीय महिला दापोडी येथे राहतात.
त्या बंडगार्डन रस्त्यावरील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. ३० मे रोजी दुपारी एकच्या सुमारास एक चोरटा रुग्णालयातील कक्षात आला.
त्याने महिलेला बाथरूममध्ये जाऊन या, असे सांगितले. चोरटा रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे महिलेला वाटले. त्यानंतर महिला बाथरूममध्ये गेल्या.
चोरट्याने रुग्ण महिलेच्या कापडी बॅगमध्ये ठेवलेली १६ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची कर्णफुले चोरून नेली. महिला बाथरूममधून आल्यानंतर काही वेळाने त्यांनी कापडी बॅगची तपासणी केली.
तेव्हा बॅगमधील दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी रुग्णालयाला भेट दिली.
रुग्णालयात तपासणी तसेच नावनोंदणी करूनच प्रवेश दिला जातो. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली असून, पोलीस हवालदार पवार पुढील तपास करत आहेत.
