आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ओशियन ट्रेडर्सकडून कोट्यवधीची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 4, 2026
Spread the love

पुणे : जिरे मसाल्याची ऑर्डर देऊन सुरुवातीला त्याचे काही पैसे देऊन, नंतर दुसरी मोठी ऑर्डर दिल्यावर सर्व पैसे देण्याचे आश्वासन देत दुकान बंद करून अनेक व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी ओशियन ट्रेडर्सच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत प्रवीण पांडुरंग मेतकुटे (वय ५०, रा. गणेशनगर, धायरी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी फरहान अख्तर खान, इरफान खान आणि चाचा (रा. मंत्री अपार्टमेंट, सॅलसबरी पार्क) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार ३ मार्च ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान सॅलसबरी पार्क येथील ओशियन ट्रेडर्स येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण मेतकुटे यांचा आयुर्वेदिक कच्चा माल व मसाले पदार्थ खरेदी-विक्रीचा व्यवसाय ‘मेडीवेल रेमेडीज’ या नावाने धायरी येथे आहे.

ते कच्चा माल मुंबई, वाशी, गुजरातमधील ऊंजा, मध्यप्रदेशातील निमच आदी ठिकाणांहून मागवून ग्राहक व्यापाऱ्यांना विक्री करतात. फरहान अख्तर खान व त्याचा भाऊ इरफान खान यांनी त्यांना ५ टन जिरे खरेदीची ऑर्डर आगाऊ पैसे न देता दिली.

बाजारात स्पर्धा असल्याने त्यांनी आगाऊ पैसे न घेता त्यांना ५ टन जिरे पुरविले. त्याचे १० लाख ९४ हजार रुपयांचे बिल दिले. फरहान अख्तर खान याने उर्वरित २ लाख ५० हजार रुपये व दुसऱ्या ऑर्डरमधील १० टन जिरे मालाचे पैसे एकदम देतो, असे सांगितले.

त्यावर मेतकुटे यांनी इतका माल पुरवू शकत नसल्याचे सांगून साडेतीन टन जिरे माल पुरविला. त्याचे १० लाख ३६ हजार २०० रुपये व मागील २ लाख ५० हजार रुपये असे एकूण १२ लाख ८६ हजार रुपयांची मागणी केली.

फरहान याने एका पार्टीचा चेक आला असून तो १७ एप्रिल २०२६ रोजी क्लिअर होईल, त्यानंतर तुमचे पैसे देतो, असे सांगितले. १७ एप्रिलनंतर फोन केला असता त्याचा फोन बंद लागला.

कार्यालयात जाऊन पाहिले असता कार्यालय बंद होते. त्यांच्या चाचाने फरहान खान आजारी असून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

फिर्यादी यांनी अधिक माहिती घेतल्यानंतर खान बंधूंनी अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले. फिर्यादी यांचे १२ लाख ८६ हजार रुपये तसेच लझ फॉर्म्स अँड ट्रेडर्सचे अब्दुल मथीन, गजानंद कंपनी, सियागंज (इंदौर) यांचे सुमित सचदेवा, असोपा सन्स, कोंढवा येथील दीपक, ए. एम. कागदोद अँड सन्स, हावेरी (कर्नाटक) येथील अमीर हमजा कागदोद, गौराई अॅग्रोटेक, सांगलीचे सागर शेगणे, सत्ययानी इंडिया प्रा. लि., अहमदाबादचे धवल, पाटलीपुत्र सुपर फूड्स प्रा. लि., पाटण येथील आय. खान तसेच सचिन इम्पेक्स ट्रेडिंग, दिल्लीचे सचिन दुआ यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून ते कार्यालय बंद करून पसार झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट करीत आहेत.