१२ वी पास गिरी करत होता गर्भलिंग निदान चाचणी
वाघोलीतील गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग : यवत गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अण्णासाहेब गिरी हा १२ वी पास असून त्याने बी. फार्मसीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, त्याने ते शिक्षण पूर्ण केले नाही. आयुर्वेदिक डॉक्टरकडे एम.आर. म्हणून काम केल्याच्या जोरावर त्याने अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी करण्यास सुरुवात केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तो गावोगावी जाऊन महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करत होता. त्यासाठी तो प्रत्येकी ४० ते ५० हजार रुपये फी घेत होता. धक्कादायक बाब म्हणजे, वाघोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत पोर्टेबल मशीन जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. इतर तिघा आरोपींचा शोध सुरू आहे.
जिल्ह्यातील गावोगावी जाऊन सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख उपस्थित होते. यातील प्रमुख आरोपी अण्णासाहेब गिरी (रा. केडगाव, ता. दौंड, मूळ रा. पारनेर, जि. अहमदनगर) याला २० मे रोजी अटक करण्यात आली आहे.
तर डॉ. अतुल अंकुश जाधव (रा. लोहगाव), नरेंद्र साहेबराव ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली), मंदार सुरेश माळी (रा. किकवी, ता. भोर) आणि सुंदरम कदम (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. गुजर यांना १७ मे रोजी एका महिलेचे गर्भलिंग निदान करत असल्याचा व्हिडिओ पाठविण्यात आला होता.
या व्हिडिओच्या आधारे त्यांनी १९ मे रोजी यवत पोलीस ठाण्यात स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आरोपी अण्णासाहेब गिरी याने नरेंद्र ठाकरे याच्याकडून सोनोग्राफी मशीन घेतल्याचे निष्पन्न झाले.
यातील आरोपी नरेंद्र ठाकरे हा वाघोलीमध्ये यावर्षीच्या सुरुवातीला दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मंदार माळी व सुंदरम कदम यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणात आतापर्यंत १५ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपींच्या बँक खात्यांतील व्यवहार, मोबाईल सीडीआर आणि इतर तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
शेकडो महिलांची तपासणी – कायद्याने प्रतिबंधित असलेली गर्भलिंग निदान चाचणी करून आरोपींनी पैशांसाठी हे संपूर्ण षडयंत्र रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मागील पाच वर्षांत आरोपीने शेकडो महिलांची तपासणी केली असल्याचे संदीप सिंह गिल यांनी सांगितले.
