आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 4, 2026
Spread the love

पुणे : अधिक मासानिमित्त जेवायला बोलावून सोन्याची अंगठी देण्यास नकार दिल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५, रा. विशाललीला सोसायटी, तुकारामनगर) असे विवाहितेचे नाव आहे. गोरख संभाजी सोनवणे (वय ३२, रा. विशाललीला सोसायटी, तुकारामनगर) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

सासरे संभाजी सोनवणे (वय ६२) आणि सासू अलका सोनवणे (वय ५५) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून २०२१ ते ३ जून २०२६ या कालावधीत घडली.

याबाबत अहिल्यानगर येथील तेजस्विनीच्या वडिलांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख सोनवणे याच्याशी तेजस्विनी हिचा जून २०२१ मध्ये विवाह झाला होता.

लग्नानंतर माहेरहून वेगवेगळ्या कारणांवरून गोरख सोनवणे व त्याचे आई-वडील पैशांची मागणी करत होते. तेजस्विनीचे आई-वडील त्यांना जमेल तशी मदत करत होते.

कार आणि घर घेण्यासाठी माहेरहून सतत पैशांची मागणी करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. यंदा अधिक मास असल्याने तेजस्विनीच्या आई-वडिलांनी जावई गोरख सोनवणे याला जेवणासाठी घरी बोलावले होते.

त्यावेळी अधिक मासाचे वाण म्हणून सोन्याची अंगठी पाहिजे, अशी गोरखने मागणी केली. मात्र, तिच्या आई-वडिलांनी पोशाख देऊन त्याचा मान ठेवला होता.

सोन्याची अंगठी न दिल्याने घरी आल्यानंतर तेजस्विनीचे जगणे असह्य करण्यात आले. त्यातून तिने ३ जून २०२६ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी पती गोरख सोनवणे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनोद धुर्वे तपास करीत आहेत.