वेगवेगळ्या टूरचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा
भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसचा चालक कार्यालय बंद करून फरार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : थ्री सिस्टर्स टूरचे आयोजन करून देतो, असे सांगून वेगवेगळ्या ग्रुपकडून १५ लाख ३७ हजार ५५० रुपये घेऊन कार्यालय बंद करून भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसचा मालक फरार झाल्याचे समोर आले आहे.
जयदीप श्रीरंग काशीकर (रा. ग्रीन लीप सोसायटी, किरकटवाडी) असे भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसच्या मालकाचे नाव आहे. याबाबत निशिकांत ठाणेदार (वय ७२, रा. बावधन) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या मित्रांनी नॉर्थ ईस्ट टूरला जाण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसच्या किरकटवाडी येथील जयवंत सदनमधील कार्यालयात संपर्क साधला.
त्यांना मालक जयदीप काशीकर याने १० रात्री व ११ दिवसांचे ५३ हजार ५५० रुपयांचे पॅकेज दिले. त्यांनी ७ जणांसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी ३ लाख ७४ हजार ८५० रुपये भरून बुकिंग केले.
त्यानंतर टूर कार्यालयातून १० मार्च २०२६ रोजी पुणे ते गुवाहाटी असा विमान प्रवास असल्याचे सांगण्यात आले. विमानाची तिकिटे व्हॉट्सअॅपवर पाठविली जातील, असेही सांगण्यात आले.
मात्र, ८ मार्च रोजी जयदीप काशीकर याने व्हॉट्सअॅप संदेश पाठवून तेथील हवामान खराब असल्याने अडचणी निर्माण झाल्या असून टूर रद्द करण्यात येत आहे. पुढील टूरबाबत नंतर कळविण्यात येईल, असे सांगितले.
त्यानंतर वेळोवेळी संपर्क करूनही पुढील टूरची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी किरकटवाडी येथील कार्यालयात संपर्क साधला.
तेथील महिलेने त्यांचा जयदीप काशीकर यांच्याशी फोनवर संपर्क करून दिला. त्यानंतर संबंधित महिलेने ३ लाख ७४ हजार ८५० रुपयांचा धनादेश दिला.
मात्र, तो बँकेत भरल्यानंतर वटला नाही. त्यानंतर २६ मार्च रोजी जयदीप काशीकर त्यांना कार्यालयात भेटला. त्याने दुसरा ३ लाख ७४ हजार ८५० रुपयांचा धनादेश दिला.
तो १० एप्रिल रोजी बँकेत भरल्यानंतर तोही परत आला. यानंतर त्यांनी जयदीप काशीकर याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद लागत होता.
तसेच कार्यालयात गेले असता कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्याच्या घरी गेले असता घरालाही कुलूप असल्याचे आढळून आले. जयदीप काशीकर याने टूर व्यवसायाच्या माध्यमातून फिर्यादींसह विनायक कांचन व इतरांकडून ११ लाख ६३ हजार रुपये, तसेच फिर्यादींकडून ३ लाख ७४ हजार ८५० रुपये असे एकूण १५ लाख ३७ हजार ५५० रुपये घेऊन टूरचे आयोजन न करता कार्यालय व घर बंद करून फरार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कसबे करीत आहेत.
