आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाच घेताना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 5, 2026
Spread the love

पुणे : नवीन वीजमीटरसाठी प्रतिमीटर १ हजार रुपयेप्रमाणे १२ मीटरसाठी १२ हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी ४ हजार ५०० रुपये आधी घेऊन उर्वरित ७ हजार ५०० रुपये स्वीकारताना हडपसर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र नारायण लोंढे (वय ४२, रा. कृष्णानगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार हे इलेक्ट्रिकल सब-कॉन्ट्रॅक्टर असून ते महावितरणाची कामे करतात. महावितरणाच्या हडपसर उपविभाग क्र. २ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र लोंढे यांनी तक्रारदारांनी केलेल्या नवीन १२ वीजमीटर जोडणीच्या कामासाठी प्रतिमीटर १ हजार रुपयेप्रमाणे १२ हजार रुपयांची मागणी केली होती.

तसेच, तक्रारदारांना मिळालेल्या अन्य एका नवीन इमारतीच्या वीजजोडणीच्या कामासाठी ५० हजार रुपयांची मागणी लोंढे करीत असल्याची तक्रार त्यांनी २ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने २ जून रोजी पडताळणी कारवाईदरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता लोंढे यांनी तक्रारदारांकडून बसविण्यात आलेल्या नवीन १२ वीजमीटर जोडणीसाठी प्रतिमीटर १ हजार रुपयेप्रमाणे १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

तसेच, त्यापैकी ४ हजार ५०० रुपये यापूर्वी घेतल्याचे कबूल केले. उर्वरित ७ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचेही स्पष्ट झाले. या लाच मागणीच्या अनुषंगाने ४ जून रोजी दुपारी महावितरणच्या हडपसर उपविभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

तक्रारदारांकडून ७ हजार ५०० रुपये स्वीकारताना रामचंद्र लोंढे यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर पुढील तपास करीत आहेत.