६ मोक्का गुन्हे असलेल्या वाँटेड सचिन घायवळला अटक
राजस्थानमधील सीकर येथून केला जेरबंद : ९ महिने देत होता गुंगारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोथरुडमध्ये गोळीबार करून दहशत निर्माण केल्यानंतर गेल्या सप्टेंबरपासून फरार असलेल्या गँगस्टर नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने राजस्थानमधील सीकर येथून जेरबंद करण्यात यश मिळवले.
सचिन बन्सीला घायवळ (वय ४८, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) असे त्याचे नाव आहे. आपल्या टोळीतील सदस्यांना टोळीची दहशत निर्माण करण्यास सांगून गँगस्टर नीलेश घायवळ हा कुटुंबासह परदेशात पळून गेला आहे.
त्याचा भाऊ सचिन घायवळ हा देशातील वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्याला पकडण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू होते. गुन्हे शाखेची पथके गेल्या काही महिन्यांपासून त्याचा माग काढत होती.
युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व त्यांचे सहकारी शोध घेत असताना पोलीस हवालदार अतुल साठे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गोपनीय माहितीद्वारे सचिन घायवळ हा राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील धिंगपूर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व पोलीस अंमलदार राजस्थान येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने सचिन घायवळ याचा शोध घेतला. तो धिंगपूर गावात भाड्याने राहत असल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याला तेथील एका घरातून ताब्यात घेण्यात आले.
त्याला गुरुवारी सायंकाळी पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आले. त्यानंतर तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सचिन घायवळ हा गेल्या ९ महिन्यांपासून फरार होता. न्यायालयानेही त्याला फरार घोषित केले होते. त्याच्यावर मोक्कासह ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे, अर्चना वाघमारे, पोलीस हवालदार मारुती पारधी, अतुल साठे, नितीन जगदाळे, अमोल काटकर, संदीप शेळके, अनुष्का जगदाळे, पोलीस अंमलदार योगेश झेंडे आणि शुभम वागसकर यांनी केली.
भाड्याने घर घेऊन राहत होता – सचिन घायवळ हा कधी “घायवळ” तर कधी “गायवळ” असे आडनाव वापरत होता. तो सोलापूरसह विविध शहरांमध्ये लपून राहत होता. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील धिंगपूर या गावात तो १० फेब्रुवारीपासून राहत होता. त्याने तेथे ६ हजार ५०० रुपये मासिक भाड्याने घर घेतले होते. त्याच्याकडे असलेल्या साडेतीन लाख रुपयांच्या रोख रकमेतून तो खर्च भागवत होता. गावातील देवस्थानात तो जेवण करत होता. अत्यंत गरज असल्यासच तो मोबाईलचा वापर करत होता. मात्र, एकदा त्याने मोबाईलचा वापर केल्यानंतर तो पोलिसांच्या रडारवर आला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली.
