आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गॅसचा स्फोट होऊन तिघे गंभीर जखमी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 5, 2026
Spread the love

पुणे : गॅस सिलेंडर बदलत असताना सिलेंडरमधून गॅसची गळती होऊन घरात स्फोट झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले असून महिलेसह ५ वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी सोसायटीतील एका घराच्या पहिल्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजता घडली.

विष्णू मुंजा गिते (वय ६०), पांडुरंग विष्णू गिते (वय ३५) आणि वृंदावनी विष्णू गिते (वय ५५) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

राजेश्री पांडुरंग गिते आणि निहारिका पांडुरंग गिते (वय ५ वर्षे) या किरकोळ जखमी झाल्या आहेत. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील खांदवेनगरमध्ये एक मजली बैठे घर आहे.

तेथील पहिल्या मजल्यावरील स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर संपल्याने दुसरा सिलेंडर लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी सिलेंडरमधून मोठ्या प्रमाणावर गॅसची गळती झाली. गॅसचा आगीशी संपर्क येताच मोठा स्फोट होऊन आग लागली.

अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळी गाडी दाखल झाली. आग विझविण्यात आली असून जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. गॅस सिलेंडरला आग लागलेली दिसत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सिलेंडरवरील आग विझवून तो सुरक्षितपणे बाहेर काढला.

या स्फोटामुळे व त्यानंतर लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच संडास, बाथरूमची दारे आणि स्वयंपाकघरातील साहित्याचे तुकडे-तुकडे झाल्याचे दिसून आले.