सायबर चोरट्यांनी तिघांची केली ७६ लाखांची फसवणूक
शेअर मार्केटमधून जादा परतावा देण्याचे आमिष : ऑनलाईन गुंतवणुकीतील वाढता धोका
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सायबर चोरटे कोणत्याही शेअरमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करत नाहीत. ते केवळ अॅपवर फायदा झाल्याचे दर्शवितात, हे अनेकदा समोर आले असतानाही ज्या व्यक्तीला कधी भेटले नाही, त्याचे कार्यालय कोठे आहे याची माहिती नाही, अशा लोकांच्या हाती बिनधास्तपणे लाखो रुपये दिले जात असल्याचे दिसून येत आहे. सायबर चोरट्यांनी तिघांना ७६ लाख ५३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे गुन्हे गुरुवारी दिवसभरात दाखल झाले.
धनकवडी येथील ३६ वर्षीय तरुणाच्या वडिलांना सायबर चोरट्यांनी एक अॅप इन्स्टॉल करण्यास सांगून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले.
त्यावर विश्वास ठेवून त्यांनी ६ नोव्हेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत ६२ लाख ७० हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली.
मात्र, त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संगीता देवकाते करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, कात्रज परिसरातील २९ वर्षीय तरुणालाही सायबर चोरट्यांनी शेअर मार्केटचे आमिष दाखवत ५ एप्रिल ते १६ मे २०२६ या कालावधीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.
त्यानंतर त्यालाही कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वाघोली येथील २६ वर्षीय तरुणाला २८ ऑगस्ट ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ट्रेडिंग केल्यास चांगला फायदा होईल, असे आमिष दाखवण्यात आले.
त्यावर विश्वास ठेवून तरुणाने ४ लाख ८० हजार ३५७ रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यालाही कोणताही मोबदला अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने त्याने वाघोली पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यावरून वाघोली पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मेहेर करत आहेत.
