मौजमजेसाठी सायकल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात
१ लाख रुपयांच्या १५ सायकली जप्त : वडील, आजोबा तुरुंगात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आईचे निधन झालेले, वडील व आजोबा गंभीर गुन्ह्यात येरवडा तुरुंगात असलेले आणि आजीबरोबर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा सांभाळ करायला कोणी नसल्याने त्याने मौजमजेसाठी सायकली चोरण्यास सुरुवात केली. अशा सायकलचोर अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख रुपयांच्या १५ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपूर चाळ परिसरात सायकल चोरीच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक लहान मुलगा सायकल घेऊन जाताना दिसत होता.
या मुलाचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार बालाजी सोगे आणि सोमनाथ गायकवाड यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सायकल चोरी करणारा मुलगा त्याच्या आजीसह नवी खडकी येथे राहत आहे.
पोलिसांनी त्याचा शोध घेऊन पालकासमक्ष त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्याच्या आईचे निधन झाले असून वडील व आजोबा एका गंभीर गुन्ह्यात सध्या तुरुंगात आहेत.
तो आजीबरोबर राहतो. त्याचा सांभाळ करण्यासाठी घरी कोणीही नाही. मौजमजेसाठी पैसे लागतात, यासाठी त्याने सायकल चोरी केल्याचे सांगितले.
सायकल चोरण्यासाठी हा मुलगा दिवसा त्या भागात जाऊन पाहणी करीत असे. त्यानंतर रात्री कोणीही नसताना सायकल चोरून घेऊन जात असे. पोलिसांनी त्याच्याकडून १५ सायकली जप्त केल्या आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास डाबेराव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड तसेच पोलीस अंमलदार मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, बालाजी सोगे, गणेश पालवे, अनिल मन्हाळकर आणि सोमनाथ गायकवाड यांनी केली.
