बार्शीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा; ४ जणांवर गुन्हे
३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त : ७१० लिटर रसायन व दारू जागीच नष्ट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बार्शी शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. ५) शहरातील विविध भागांत धडक कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ६५० लिटर गुळमिश्रित रसायन व ६० लिटर तयार हातभट्टी दारू पंचांसमक्ष जागीच नष्ट करण्यात आली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि बार्शी विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
पहिली कारवाई सकाळी सुमारे ७.१० वाजता नाळे प्लॉट परिसरात करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पत्र्याच्या शेडच्या आडोशाला छापा टाकला असता लता धनु पवार (वय ६५, रा. नाळे प्लॉट, बार्शी) ही बेकायदेशीररित्या हातभट्टी दारूचे रसायन तयार करताना आढळून आली.
तिच्याकडून १०० लिटर गुळमिश्रित रसायन (किंमत ५,००० रुपये) व १० लिटर हातभट्टी दारू (किंमत १,००० रुपये) असा एकूण ६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने सुभाषनगर व ताडसौदणे रोड परिसरातील गायकवाड पट्टी येथे दोन ठिकाणी छापे टाकले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुनिता राजू पवार (वय ३०, रा. गायकवाड पट्टी, बार्शी) आणि मिना दीपक पवार (वय ३५, रा. गायकवाड पट्टी, बार्शी) या दोघींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून प्रत्येकी १५० लिटर गुळमिश्रित रसायन (किंमत ७,५०० रुपये) व २० लिटर हातभट्टी दारू (किंमत २,००० रुपये) असा एकूण १९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसरी कारवाई सोलापूर रोडवरील पारधी कॅम्प परिसरात करण्यात आली. येथे आप्पा लगमान काळे (वय ३७, रा. पारधी कॅम्प, बार्शी) हा प्लास्टिकच्या बॅरलमध्ये हातभट्टी दारूचे रसायन ढवळताना पोलिसांना रंगेहात आढळून आला.
त्याच्या ताब्यातून २५० लिटर गुळमिश्रित रसायन (किंमत १२,५०० रुपये) व १० लिटर हातभट्टी दारू (किंमत १,००० रुपये) असा एकूण १३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले गुळमिश्रित सडलेले रसायन व हातभट्टी दारू हे मानवी आरोग्यास अत्यंत घातक व वाहतुकीस अयोग्य असल्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष जागीच ओतून नष्ट करण्यात आले.
तसेच रासायनिक विश्लेषणासाठी आवश्यक नमुने सील करून जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा (Mumbai Prohibition Act) कलम ६५ (फ), ६५ (ब) व ६५ (ई) अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोहेकॉ लाड आणि पोना जाधव करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सत्यवान जाधव, पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण मुठाळ, पोलीस कॉन्स्टेबल वैभव भांगे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल आरती कजबे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
बार्शी शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र आणि आक्रमकपणे सुरू राहणार असून, नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन बार्शी शहर पोलिसांनी केले आहे.
