महावितरणाच्या वायरमनला २ लाखांची लाच घेताना केली अटक
वीज जोडणीचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची देहूगावात कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : खेड तालुक्यातील प्लॉटवरील ११ वीजमीटरच्या जोडणीचे कंत्राट मिळवून देण्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणाच्या वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
गजानन बाळासाहेब चट्टे (वय ३५, रा. मिडास रिजन्सी, विठ्ठलवाडी, देहू बायपास रोड, मूळ रा. हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली) असे अटक करण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे.
तक्रारदार हे शासकीय इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी खेड तालुक्यातील येलवाडी येथील संत तुकारामनगरमधील गुठेवारीच्या ११ प्लॉटपैकी एक गुंठा प्लॉट खरेदी केलेल्या एका महिलेसाठी नवीन वीजमीटर बसविण्याचे कंत्राट घेतले होते.
तक्रारदारांनी त्या महिलेकडून वीजमीटरसाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन तिच्या नावाने महावितरणकडे ऑनलाइन अर्ज केला होता.
हा अर्ज महावितरणच्या संकेतस्थळावर अपलोड झाल्यानंतर तक्रारदार महावितरणचे वायरमन चट्टे यांना जागेचा सर्व्हे करून देण्यासाठी भेटले होते.
त्यावेळी चट्टे यांनी तक्रारदारांना त्या प्लॉटिंगमधील सर्व ११ प्लॉटचे वीजमीटर बसविण्याचे कंत्राट मिळवून देतो, असे सांगितले. त्याबदल्यात ११ नवीन वीजमीटर बसविण्यासाठी तक्रारदारांकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याबाबतची तक्रार ५ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली. त्याच दिवशी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये चट्टे याने ११ प्लॉटच्या नवीन वीजमीटर जोडणीसाठी २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर देहूगावातील भैरवनाथ चौक येथे शुक्रवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला. तक्रारदारांकडून २ लाख रुपये स्वीकारताना चट्टे याला रंगेहात पकडण्यात आले. देहूरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त भारती मोरे यांनी केली. पोलीस निरीक्षक संतोष पाटील पुढील तपास करीत आहेत.
