आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणाकडून २० लाखांचे मेफेड्रोन जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 6, 2026
Spread the love

पुणे : राजस्थानमधून मेफेड्रोन आणून पुण्यात विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कर तरुणाला अंमली पदार्थविरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून २० लाख ९८ हजार ४०० रुपयांचे १०४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे.

इमरान युसुफ शेख (वय ३८, रा. थिटेनगर, खराडी, मूळ रा. प्रतापगड, राजस्थान) असे या तस्कराचे नाव आहे. अंमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण हे ५ जून रोजी आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत होते.

त्यावेळी पोलीस अंमलदार निशिकांत सावंत यांना एचपी पेट्रोल पंपापासून काही अंतरावर बसस्टॉपशेजारी एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० लाख ९८ हजार ४०० रुपयांचे १०४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ आढळून आला. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दरोडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तसेच पोलीस अंमलदार निशिकांत सावंत, अमोल सरडे, रिहान पठाण, संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षीरसागर, सचिन लोहार, विजय कांबळे, तुषार साळुंखे, राहुल शिंदे, आशा भिंगारे, जान्हवी सूर्यवंशी, मंगेश गुंड आणि अक्षय शिर्के यांनी केली.