बार्शी तहानलेली, पाणीप्रश्नी नागरिकांमध्ये तीव्र संताप
१०-१२ दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा : सोपलांचे पत्र, अक्कलकोटे यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरातील गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे आमदार ॲड. दिलीप सोपल यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नागरिकांसमवेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आमदार सोपल यांनी नगर परिषदेकडे पाठविलेल्या पत्रात आठ दिवसाआड होणारा पाणीपुरवठाही अनियमित होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पाईपलाईन दुरुस्ती व देखभालीवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी मुख्याधिकारी तैमूर मुलाणी आणि पाणीपुरवठा अभियंता अजय होणखांबे यांची भेट घेऊन कडक शब्दांत इशारा दिला.
बार्शीत सध्या १० ते ११ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
यात भर म्हणजे नागरिकांना अनियमित पाणीपुरवठ्यासह दूषित पाण्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. १० ते ११ दिवसांनी नळाला पाणी येते, मात्र तेही अनेकदा गढूळ, मळकट व पिवळसर स्वरूपाचे असल्याच्या तक्रारी आहेत.
पिण्यायोग्य नसलेल्या या पाण्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली असून आरोग्याबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. “पाणी नाही, आणि आले तरी स्वच्छ नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अक्कलकोटे म्हणाले की, अतिवृष्टी व वादळामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असेल तर नगर परिषदेकडून किमान २१ प्रभागांसाठी २१ टँकरची व्यवस्था करण्यात यावी.
तसेच बंद पडलेले बोअर वेळेत दुरुस्त होत नसल्याने व ठेकेदारांची बिले प्रलंबित राहिल्याने कामात दिरंगाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील पाईपलाईन लिकेज दुरुस्तीबाबतही अशीच परिस्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले.
टंचाईच्या काळात पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करावी, अन्यथा आंदोलनास सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. “करवसुलीच्या वेळी दारोदारी कुदळ-फावडे घेऊन फिरणारी पालिका पाणीटंचाईच्या काळात मात्र का टाळाटाळ करते?” असा सवाल उपस्थित करत यापुढे या प्रश्नावर कोणतीही हयगय सहन केली जाणार नसल्याचे अक्कलकोटे यांनी स्पष्ट केले.
