आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सोसायटीच्या प्रशासकानेच ३२ लाखांचा केला अपहार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 6, 2026
Spread the love

पुणे : सोसायटीच्या प्रशासकाने पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून सोसायटीच्या बँक खात्यातून परस्पर ३२ लाख रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत नीलकमल सोसायटीचे चेअरमन मकरंद मांडके (वय ५५) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अलंकार पोलिसांनी अतुल रमेश महाजन (वय ५१, रा. धनकवडी) आणि शिवाजी भीमराव राठोड (रा. हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथील नीलकमल सोसायटीमध्ये सहायक निबंधक यांनी ऑडिटर अतुल महाजन यांची २० मार्च २०२३ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.

त्यांनी सोसायटीची निवडणूक घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोसायटीचा कार्यभार सोपविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे न केल्याने उपनिबंधक कार्यालयाने राम गोरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.

राम गोरे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडून नवीन सात सदस्यीय समितीची नियुक्ती केली. त्यामध्ये फिर्यादी मकरंद मांडके यांची चेअरमन, मंदार चिडगोपकर यांची सचिव आणि मुकुंद शेंबवणेकर यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली.

नवीन समितीचे केवायसी करण्यासाठी ते बँकेत गेले असता खात्यात केवळ १ लाख ४४ हजार ७३० रुपये शिल्लक असल्याचे आढळून आले. प्रशासकाकडे कारभार गेला तेव्हा बँक खात्यात किमान ४० लाख रुपये होते.

प्रशासक म्हणून काम करताना अतुल महाजन यांच्याकडे सर्व अधिकार होते. त्यावेळी शिवाजी राठोड हा त्यांच्यासोबत काम करत होता.

या कालावधीत या दोघांनी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून कॉसमॉस बँकेतील नीलकमल सोसायटीच्या खात्यातून सोसायटीच्या वतीने ठेवण्यात आलेली ३२ लाख रुपयांची रक्कम काढून घेत अपहार केला.

सोसायटीने आता लेखापरीक्षणास सुरुवात केली असून, त्यातून या दोघांनी नेमक्या किती रकमेचा अपहार केला आहे, हे समोर येणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करीत आहेत.