आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोल्ड्रिंक्स गोडाऊन चोरीचा चार दिवसांत उलगडा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 6, 2026
Spread the love

बार्शी : शहरातील सुभाष नगर येथील व्यापारी संदीप राजेश जगताप यांच्या कोल्ड्रिंक्स गोडाऊनमधून चोरीस गेलेल्या स्टिंग कोल्ड्रिंक्सच्या बॉक्सप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या चार दिवसांत गुन्ह्याचा छडा लावला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मालापैकी ६१ स्टिंग कोल्ड्रिंक्सचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुभाष नगर परिसरातील संदीप राजेश जगताप यांच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ८२ स्टिंग कोल्ड्रिंक्सचे बॉक्स चोरून नेले होते.

या घटनेची माहिती मिळताच जगताप यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या.

त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली.

तसेच तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळत दिनांक ५ जून २०२६ रोजी अनिकेत राजू केंगार व किरण मारुती पोठे (दोघेही रा. पंकज नगर, बार्शी) यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मालापैकी ६१ स्टिंग कोल्ड्रिंक्सचे बॉक्स जप्त केले. उर्वरित मालाबाबतही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावत चोरीतील मोठ्या प्रमाणातील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याने या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणला.

ही यशस्वी कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, पोहेकॉ. आमोल माने, पोहेकॉ. प्राविण साठे, पोकॉ. इसामिया बहिरे, बाळकृष्ण मुठाळ, राहुल उदार, अविनाश पवार, सचिन नितनात, आंकूश जाधव, सचिन देशमुख, सचिन राऊत, पोलीस अजीज शेख, सतीश उघडे, संतोष जाधवर, पोलीस प्रल्हाद अकुलवार, दत्ता सोमवाड, वैभव भांगे आणि वैभव माळी यांनी मोलाची कामगिरी बजावली. दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल इसामिया बहिरे हे करीत आहेत.