बहुजन क्रांती सेनेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल
महिलेची ४० लाखांची फसवणूक : व्यवसायासाठी शासकीय अनुदान मिळवून देण्याचे दिले आश्वासन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : व्यवसायासाठी शासकीय अनुदान मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेची ४० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बिबवेवाडी पोलिसांनी बहुजन क्रांती सेना या संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमोल कृष्णा चव्हाण (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत नुपूर नितीन झरकर (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अमोल चव्हाण याच्याशी वडिलांमार्फत तीन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्याने महिलेला व्यवसायासाठी शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.
त्यासाठी संस्थेमध्ये काही गुंतवणूक करावी लागेल, असे त्याने सांगितले. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला २ लाख १४ हजार रुपयांची गुंतवणूक केली.
अनुदानाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने आणखी एका व्यवसायासाठी अर्ज करण्यास सांगून त्यासाठी ३ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले.
त्यानुसार त्यांनी एकूण १६ लाख ४४ हजार रुपये भरले. मात्र, अनुदानाबाबत विचारणा केल्यावर तो वारंवार वेगवेगळी कारणे सांगत होता.
फिर्यादींनी अधिक चौकशी केल्यानंतर त्यांच्या वडिलांकडून, काकांकडून तसेच इतर नातेवाईकांकडूनही त्याने शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतल्याचे समोर आले.
पैसे परत देण्यास त्याने टाळाटाळ केल्याने त्यांनी अखेर पोलिसांकडे फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे करीत आहेत.
