भेसळखोरांवर तुकाराम मुंढेंचा मोठा दणका
पुण्यात ४७ लाखांचा पनीर-खवा साठा जप्त : राज्यभरातील कारवाईत १९२ जणांना अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेअंतर्गत पुण्यासह राज्यभरात भेसळखोरांविरोधात मोठी धडक कारवाई करण्यात आली. पुण्यात भेसळयुक्त पनीर, खवा, तूप आणि चीजसदृश पदार्थांच्या संशयावरून तब्बल ४७ लाख ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून, राज्यभरातील विविध कारवाईंमध्ये १९२ जणांना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पुण्यातील सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर परिसरातील १७ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान ३५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
जप्त करण्यात आलेल्या साठ्यात २ हजार ८०६ किलो पनीर, १३ हजार १२७ किलो खवा, १३८ किलो चीज अॅनालॉग आणि ९६० किलो तूप यांचा समावेश आहे. या सर्व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
याशिवाय सातारा जिल्ह्यातील माण, जावळी आणि कराड तालुक्यांमध्ये तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ लाख ३८ हजार रुपयांचा संशयित साठा जप्त करण्यात आला.
दरम्यान, १ ते ५ जून या कालावधीत राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम घातक पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत १९५ ठिकाणी छापे टाकून १ कोटी ९९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. तसेच १९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
धाराशिव, समृद्धी महामार्ग आणि धुळे येथेही कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. तर पिंपरी-चिंचवडमध्ये सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधातील ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
