विठूनामाच्या गजरात दुमदुमला सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा परिसर
आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात : पर्यावरण संवर्धनाचा जागर
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आषाढी एकादशीनिमित्त सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये पारंपरिक पालखी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोष, अभंग, टाळ-मृदंगाच्या गजरासह विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा अनुभव घेतला. यावेळी ‘जलसंवर्धन’चा सामाजिक संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीवही जागविण्यात आली.
ज्ञानोबा माउली-तुकाराम, जय हरी विठ्ठल, विठ्ठल-विठ्ठल अशा विठूनामाच्या गजरात आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. डोक्यावर तुळशीची वृंदावने, हातात भगवे पताके, टाळ-चिपळ्या आणि विठूनामाचा अखंड गजर यामुळे शाळेच्या परिसरात पंढरीच्या वारीचे जिवंत चित्र साकार झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग, भक्तिगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित पालक व शिक्षकांची मने जिंकली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, आषाढी वारीचे महत्त्व तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर संतांच्या विचारांचा परिचय करून देण्यात आला. श्रद्धा, समता, सेवा, नम्रता आणि समाजहिताचा संदेश देणारी वारकरी परंपरा अनुभवात्मक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. कथाकथन, भक्तिगीते, संवादात्मक उपक्रम आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांतून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा आनंद लुटला.
यंदाच्या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण ‘जलसंवर्धन’ हा सामाजिक संदेश होता. पाण्याचे महत्त्व, पाणी वाचविण्याच्या सवयी, पावसाचे पाणी साठविण्याची गरज आणि दैनंदिन जीवनात पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांना विविध कृतीप्रधान उपक्रमांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांचा समन्वय साधणारे विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, सांस्कृतिक अभिमान आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता अधिक दृढ करण्याचा शाळेचा सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या भक्ती, समता आणि सामाजिक ऐक्याची जिवंत परंपरा आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होतो, तसेच पर्यावरण संवर्धनाची जाणीवही दृढ होते. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
