आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुंडावर एमपीडीए कारवाई

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 8, 2026
Spread the love

पुणे : बेकायदा अग्निशस्त्रे बाळगण्याबरोबरच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सराईत गुंडावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई केली आहे. त्याला वाशीम कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

आर्यन विनोद पवार (वय २१, रा. माळी आळ, बावधन) असे या सराईत गुंडाचे नाव आहे. आर्यन पवार हा सराईत गुन्हेगार असून २०२४ पासून पुणे शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणे, हत्यारे बाळगणे, अंमली पदार्थांची विक्री करणे, दुखापत करणे, मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, जाळपोळ करून मालमत्तेचे नुकसान करणे, चिथावणी देणे आदी गंभीर गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. त्यामुळे परिसरात त्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.

नांदेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला. अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून आर्यन पवार याला एक वर्षासाठी वाशीम कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. नांदेड सिटी पोलिसांनी आर्यन पवार याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन वाशीम कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड तसेच पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव, अनिल बारड आणि कैलास केंद्रे यांनी ही कारवाई केली.