आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खाकी गणवेश घालून रुबाब दाखविणारी तोतया पीएसआय गजाआड

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 8, 2026
Spread the love

पुणे : स्किन क्लिनिकमध्ये खाकी गणवेशात येऊन आपण पीएसआय असल्याचे सांगून लवकर नंबर लावण्याचा प्रयत्न एक महिला करत होती. तेथेच उपचारासाठी आलेल्या सहायक पोलीस फौजदारांनी तिच्या गणवेशावर चुकीच्या ठिकाणी लावलेली नेमप्लेट आणि लायनर तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेली स्टिक पाहून तिची तोतयागिरी उघडकीस आणली. या तोतया महिला पोलीस उपनिरीक्षकाला लष्कर पोलिसांनी गजाआड केले आहे.

समिना आसिफ इनामदार ऊर्फ समिना आयु पठाण (वय २५, रा. म्हाळुंगे) असे या तोतया महिलेचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार महेश भगवान शिंदे (वय ५०) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही घटना कॅम्पमधील व्हिक्टरी चित्रपटगृहासमोरील एका स्किन क्लिनिकमध्ये ६ जून रोजी सकाळी १० वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक फौजदार शिंदे हे उपचारासाठी या क्लिनिकमध्ये गेले होते. त्यावेळी तेथे खाकी गणवेशात एक महिला आली होती.

ही महिला रिसेप्शनवर, “मी पोलीस उपनिरीक्षक आहे. ड्युटीवरून आले आहे. मला लवकर अपॉइंटमेंट हवी,” असे सांगत होती. शिंदे तेथे गेले असता तिने त्यांना, “माझा नंबर लवकर लावायला सांगा,” असे सांगितले.

शिंदे यांनी तिचा खाकी गणवेश पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, तिने उजव्या बाजूला नेमप्लेट (संपूर्ण नाव) न लावता ती डाव्या बाजूला लावली होती. तसेच डाव्या बाजूला असलेला लायनर (शिट्टीसाठीची दोरी) उजव्या बाजूला लावला होता. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी “तुमचा नंबर लावून देतो,” असे सांगून तिच्याकडे विचारपूस सुरू केली.

तिने सांगितले की, “मी बाणेर पोलीस ठाण्यात कार्यरत असून आताच नाईट ड्युटी करून आले आहे.” तिच्या हातात सहायक पोलीस आयुक्त व त्यावरील अधिकाऱ्यांना वापरण्याची परवानगी असलेली लाकडी स्टिक होती. त्यामुळे शिंदे यांची शंका अधिकच बळावली. त्यांनी बाणेर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव विचारले असता तिने चुकीचे नाव सांगितले. त्यामुळे ती तोतया असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यातून महिला पोलीस अंमलदारांना बोलावून तिला ताब्यात घेतले. तिची रीतसर चौकशी केल्यानंतर तिने आपण खोटे सांगितल्याची कबुली दिली. “मला पीएसआय व्हायची इच्छा होती,” असे तिने सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत.