आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हायप्रोफाईल रेव्ह पार्टीतील ७८ जणांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 8, 2026
Spread the love

पुणे : आळंदी-मारकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात झालेल्या रेव्ह पार्टीत केवळ दारूच नव्हे, तर अंमली पदार्थांचेही सेवन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्टीतील २३ तरुणांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय असून, त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. पोलिसांनी हा बंगला सील केला आहे.

‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीमध्ये ४९ तरुणीही सहभागी झाल्या होत्या. त्यांची तपासणी करून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.

अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय असलेल्या २३ तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी डी मोरो कंपनीच्या मालकांसह ७८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अनिक सुरवसे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदी-मारकळ रोडवरील हा खासगी बंगला पिंपरी येथील नरेंद्र सुंदरलाल चुघ यांच्या कुटुंबीयांचा असल्याची माहिती समोर आली आहे.

हा बंगला लग्नसमारंभ तसेच छोट्या-मोठ्या पार्ट्यांसाठी भाड्याने दिला जातो. येथे नेहमीच विविध कार्यक्रम होत असतात. पोलिसांनी हा बंगला आता सील केला आहे.

या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचे सेवन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या १५ पोलीस अधिकारी व ६५ पोलीस अंमलदारांनी छापा टाकून ही रेव्ह पार्टी उघडकीस आणली.

या ठिकाणाहून ३ ग्रॅम गांजा, हुक्का पॉट, तसेच ९ लाख २२ हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या, साऊंड सिस्टिम आदींसह तब्बल ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे या अधिक तपास करीत आहेत.