आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ग्राम महसूल अधिकार्‍यासह दोघांना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 9, 2026
Spread the love

पुणे : जमिनीच्या ७/१२ वर वारसा नोंद करण्याचा अर्ज सहा महिने प्रलंबित ठेवून नोंदीसाठी १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी ७० हजार रुपये खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारताना ग्राम महसूल अधिकार्‍याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

ग्राम महसूल अधिकारी सुनील भिकाजी सातोसे (वय ४४, रा. आय ट्रेंड लाइफ, वाकड) आणि खासगी व्यक्ती नेमाजी माधवराव भोकरे (वय ४०, रा. काकडे सिटी, चर्‍होली खुर्द रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या आजोबांची चर्‍होली बुद्रुक येथे वडिलोपार्जित जमीन आहे.

त्यांच्या आजोबांच्या निधनानंतर या शेतजमिनीवर तक्रारदार यांचे वडील व काका यांची वारस नोंद लावण्यासाठी तक्रारदार यांनी डिसेंबर २०२५ मध्ये चर्‍होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयातील अधिकारी तथा तलाठी सुनील सातोसे यांच्याकडे अर्ज दिला होता. तक्रारदार यांनी वारंवार चौकशी करूनही सुनील सातोसे यांनी वारस नोंद केली नाही.

२९ मे रोजी तक्रारदार वारस नोंदणीबाबत पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी चर्‍होली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात गेले होते. त्यावेळी सुनील सातोसे याने तक्रारदारांकडे वारस नोंदीसाठी १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर त्याने ८० हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबतची तक्रार १ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ जून रोजी पडताळणी केली. त्यामध्ये सुनील सातोसे याने ८० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ७० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच ही रक्कम खासगी व्यक्ती नेमाजी भोकरे याच्याकडे देण्यास सांगितले होते.

त्यानुसार ८ जून रोजी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चर्‍होली बुद्रुक येथील ग्राम महसूल कार्यालयात सापळा रचला. तक्रारदारांकडून ७० हजार रुपये स्वीकारताना नेमाजी भोकरे याला पकडण्यात आले. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी सुनील सातोसे यालाही ताब्यात घेण्यात आले.

दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. सहायक पोलीस आयुक्त निता मिसाळ या अधिक तपास करीत आहेत.