आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हप्ता न दिल्याने तिघांवर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 9, 2026
Spread the love

पुणे : खुनाचा गुन्हा असलेल्या गुंडाने आपल्या दोन साथीदारांसह हप्ता न दिल्याच्या कारणावरून रिक्षाचालकासह तिघांवर चाकूने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी या प्रकरणी दोघा गुंडांना अटक केली आहे.

निहाल गवळी (वय २०, रा. श्रुती मोहल्ला, खडकी) आणि पृथ्वी पवार ऊर्फ नानू (वय २०, रा. खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गणेश रास्ते ऊर्फ पिंट्या याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गंगाराम तोटाप्पा गायकवाड (वय ४०, रा. सावित्री विहार, रेंजहिल्स, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेत गंगाराम गायकवाड व त्यांचे मित्र चंद्रकांत बडनेर हे जखमी झाले असून परशुराम चौडाप्पा गायकवाड (वय ३५) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना रेंजहिल्स येथील छोट्या बोगद्याजवळ ७ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. निहाल गवळी हा अल्पवयीन असताना एका खुनाच्या गुन्ह्यात सहभागी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाराम गायकवाड हे रिक्षाचालक आहेत. ते चंद्रकांत बडनेर आणि परशुराम गायकवाड यांच्यासोबत रेंजहिल्स येथील छोट्या बोगद्याजवळ गप्पा मारत उभे होते.

त्यावेळी निहाल गवळी, पृथ्वी पवार आणि गणेश रास्ते हे दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी गंगाराम गायकवाड यांच्याकडे ५०० रुपयांचा हप्ता मागितला.

त्यांनी नकार दिल्यानंतर निहाल याने त्याच्याकडील चाकूने गंगाराम यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार केले. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.

हे पाहून चंद्रकांत आणि परशुराम हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. त्यावेळी आरोपींनी चंद्रकांत यांच्या हातावर चाकूने वार केले. तसेच परशुराम यांच्या पोटावर व डोक्यावर वारंवार वार केले.

त्यामुळे त्यांच्या पोटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि ते घटनास्थळीच कोसळले. त्यावेळी तो मेला असल्याचे समजून तिघेही येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे पाहत “हम खडकी के भाई है” असे ओरडू लागले.

तसेच फिर्यादींना “अभी हर महिना ५०० रुपये नही दिया तो तेरे घरवालों को भी नही छोडूंगा” अशी धमकी देत शिवीगाळ केली आणि तेथून पळ काढला.

खडकी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडीलकर पुढील तपास करीत आहेत.