आंदेकर टोळीतील रेकॉर्डवरील गुंड जेरबंद
गेल्या ८ महिन्यांपासून होता फरार : सोलापूर बाजारजवळ गुन्हे शाखेच्या युनिट १ ने केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कुख्यात गँगस्टर बंडू आंदेकर याच्या टोळीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या ८ महिन्यांपासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील गुंडाला सोलापूर बाजार परिसरातील कॅनॉलजवळून गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने सापळा रचून कोयत्यासह अटक केली.
ओम गणेश नगरकर (वय २४, रा. यश रेसिडेन्सीच्या टेरेसवर, हडपसर गाव) असे या गुंडाचे नाव आहे. बंडू आंदेकर टोळीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात आयुष कोमकर याचा खून केला होता.
या प्रकरणात समर्थ पोलीस ठाण्यात बंडू आंदेकर टोळीतील ओम नगरकर याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो गेल्या आठ महिन्यांपासून फरार होता.
आंदेकर टोळी, सोमनाथ गायकवाड टोळी व सूरज ठोंबरे टोळीतील सक्रिय गुंडांकडून आणखी गंभीर गुन्हे घडण्याची दाट शक्यता असल्याने त्यांचा नियमित शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्याकडून कोणताही गंभीर गुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला वेळोवेळी दिल्या होत्या.
त्यानुसार ८ जून रोजी युनिट १ चे पोलीस निरीक्षक अजित जाधव व त्यांचे सहकारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार निलेश साबळे व हेमंत पेरणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आंदेकर टोळीतील फरार आरोपी सोलापूर बाजार येथील कॅनॉल परिसरात आला आहे. माहितीची खात्री करून पोलीस पथकाने सापळा रचून ओम नगरकर याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी कोयता व मोबाईल आढळून आला. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार विनोद शिंदे, निलेश साबळे, हेमंत पेरणे, सिद्धेश्वर वाघमारे, सुहास डोंगरे, संदेश काकडे, अमित जमदाडे, मयूर भोसले व अविनाश दळवी यांनी केली.
