आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हॉटेल व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 9, 2026
Spread the love

पुणे : हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विवेक मुकुंदराव आत्रे (वय ४०) आणि माया विलास साबळे (वय ३८, दोघे रा. रोहन गरिमा सोसायटी, सेनापती बापट रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत रागिणी चेतन गुंजाळ (वय ३६, रा. गुंजाळवाडी, सेनापती बापट रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडारवाडी येथे २०२२ ते आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉर्गेज कर्जाच्या प्रकरणातून रागिणी व चेतन गुंजाळ यांची विवेक आत्रे व माया साबळे यांच्याशी ओळख झाली होती.

त्यांनी एक पानटपरी चालविण्यास घेतली होती. त्यासाठी रागिणी यांनी ५ लाख रुपये दिले होते. पानटपरी व्यवस्थित चालत असताना त्यांनी त्याच्या शेजारील कुबेरा हॉटेल चालविण्यास घेतले.

रागिणी गुंजाळ यांना हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष विवेक आत्रे व माया साबळे यांनी दाखविले होते. गेल्या तीन ते चार वर्षांत आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी २२ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले.

मात्र, हॉटेल व्यवसायात भागीदारी दिली नाही. रागिणी चेतन गुंजाळ यांनी २२ लाख रुपये परत मागितले असता विवेक आत्रे याने त्यांना शिवीगाळ केली.

तसेच, “मी पैसे परत करणार नाही, कोणाला सांगायचे ते सांगा, मी कोणाला घाबरत नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.