आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुंढे पॅटर्नचा धडाका : सोलापूर जिल्ह्यात पनीर पदार्थ गायब!

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 9, 2026
Spread the love

सोलापूर : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भेसळयुक्त दूध, पनीर व दुग्धजन्य पदार्थांवर सुरू असलेल्या कारवायांमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, सोलापूर जिल्ह्यातील अनेक हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

गेल्या काही दिवसांत शहरातील अनेक हॉटेलमध्ये पनीर मसाला, पनीर तडका, पनीर चिल्ली, कढई पनीर यांसारखे लोकप्रिय पदार्थ उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

अनेक ठिकाणी हे पदार्थ थेट मेन्यूमधून वगळण्यात आले आहेत. ग्राहकांनी चौकशी केल्यावर ‘पनीरचा पुरवठा कमी आहे’ किंवा ‘माल मिळत नाही’ अशी कारणे देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

याशिवाय चीज, लस्सी, मसाला दूध, रबडी, बासुंदी यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची उपलब्धताही लक्षणीयरीत्या घटली आहे. काही ठिकाणी हे पदार्थ पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

पूर्वी सहज उपलब्ध असणारे हे पदार्थ अचानक कमी झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दूध संकलनात घट झाल्याच्या चर्चाही सध्या बाजारात रंगत आहेत.

राज्यातील काही भागांतून दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा कमी झाल्याचे बोलले जात असून, त्याचा परिणाम किरकोळ बाजारपेठ आणि हॉटेल व्यवसायावर झाल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे आजवर बाजारात विक्री होणाऱ्या काही पदार्थांच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी, रेणुका पाटील, नंदनी हिरेमठ, उमेश भुसे, अशोक इलगर, मंगेश लवटे, वीर स्वामी, कीर्ती देशमुख, उत्कर्ष एकंडे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ व दुग्धजन्य पदार्थांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

जिल्ह्यातील हॉटेल, डेअरी, दूध संकलन केंद्रे व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांच्या हालचालींवर प्रशासनाची करडी नजर असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

एफडीएच्या वाढत्या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, याचाच परिणाम म्हणून काही ठिकाणी दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा कमी झाल्याची चर्चा सोलापूर शहरासह सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रंगत आहे.

मात्र दूध व पनीरच्या तुटवड्याबाबत अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, प्रशासनाकडून तपास आणि निरीक्षणाची मोहीम सुरूच आहे.