आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अधिक मासानिमित्त भूमच्या दत्त मंदिरात सामुदायिक इष्टलिंग महापूजा उत्साहात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 9, 2026
Spread the love

भूम : अधिक मासानिमित्त भूम शहरातील दत्त मंदिर येथे श्री १०८ गुरुगिरी वीरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक इष्टलिंग महापूजा, धार्मिक विधी, धर्मसंस्कार, आशीर्वचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमाला वीरशैव लिंगायत समाजातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना श्री १०८ गुरुगिरी वीरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज म्हणाले की, सूर्य व चंद्र यांच्या गतीनुसार कालगणना केली जाते. त्यानुसार दिवस-रात्र तसेच तिथींचे गणित निश्चित होत असते. तीन वर्षांच्या कालावधीनंतर येणाऱ्या अधिक मासाला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व असून या महिन्यात तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान, देवदर्शन, जप-तप, व्रत-वैकल्ये तसेच दानधर्म केल्यास अनेकपटींनी पुण्यप्राप्ती होते. जीवनाच्या कल्याणासाठी अधिक मास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, असे त्यांनी सांगितले.

सकाळपासूनच दत्त मंदिर परिसरात भक्तिमय व धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. श्री मानूरकर महाराज यांच्या हस्ते विविध धार्मिक विधी, अनुष्ठान, सामुदायिक इष्टलिंग महापूजा तसेच धर्मसंस्कार विधी संपन्न झाले. त्यानंतर झालेल्या आशीर्वचन सोहळ्यात भाविकांना अध्यात्म, संस्कार आणि धर्माचरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

कार्यक्रमाचे पौरोहित्य ओम स्वामी, मनोज स्वामी व मनन स्वामी यांनी केले.

या कार्यक्रमास भूम नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, नगरसेवक अभिजीत शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अशोक तोडकर, महेश मनगिरे, सिद्धेश्वर मनगिरे, मधुकर शेटे, प्रभाकर शेटे, धनंजय शेटे, श्रीकांत नकाते, संजय होळकर, अमित होळकर, महादेव मनगिरे, अमोल स्वामी यांच्यासह वीरशैव लिंगायत समाजातील महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आशीर्वचन व दर्शन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक भक्ती, अध्यात्मिक वातावरण आणि समाजातील ऐक्यभावनेचे दर्शन घडविणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.