सिमेंट मिक्सर उलटून दुचाकीस्वाराचा मृत्यू
तरुण दुचाकीसह मिक्सरखाली सापडला : नवले पूल चौकातील भीषण अपघात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कात्रज-बावधन बाह्यवळण मार्गावरील नवले पूल चौकात भरधाव १६ चाकी सिमेंट मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१० जून) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
मृत दुचाकीस्वाराचे नाव रामेश्वर मच्छिंद्र भोगले (वय ३१, सध्या रा. वाघजाईनगर, कात्रज, मूळ रा. सांगवी, ता. हाजीपूर, जि. बीड) असे आहे. तर अपघातात सिमेंट मिक्सर चालक गोरख लक्ष्मण रणसुरे (वय ५०, रा. काळभोर बिल्डिंग, लोणी रेल्वे स्थानकाजवळ, लोणी काळभोर) हा किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती नर्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-बावधन बाह्यवळण मार्गावरून सिमेंट मिक्सर मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पूल परिसरातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने १६ चाकी सिमेंट मिक्सर रस्त्यावर उलटला. त्याचवेळी तेथून जात असलेले दुचाकीस्वार रामेश्वर भोगले हे मिक्सरच्या खाली अडकले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर मिक्सर चालक गोरख रणसुरे याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नर्हे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त मिक्सर बाजूला काढून वाहतूक पूर्ववत केली.
या प्रकरणी नर्हे पोलीस ठाण्यात सिमेंट मिक्सर चालक गोरख रणसुरे याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
