सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त
सिंहगड पोलिसांची कामगिरी : गुन्हा दाखल झाल्यानंतर होता फरार; हिंगणे खुर्दमध्ये कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून सिंहगड रोड पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे.
यश ऊर्फ दाद्या कमलाकर घोलप (वय १८, रा. आझाद मंडळाजवळ, चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
यश घोलप याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार राहुल ओलेकर आणि विनायक मोहिते यांना माहिती मिळाली की, तो हिंगणे खुर्द येथील कॅनॉल रस्त्यावर थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे.
पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक भूपेश साळुंके, इसराईल शेख, पोलीस अंमलदार उत्तम तारू, अण्णा केकाण, प्रफुल्ल चव्हाण, सतीश मोरे, विकास बांदल, तानाजी सागर, सागर शेडगे, युवराज कांबळे आणि शिरीष गावडे यांनी केली.
