आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विमाननगरमध्ये प्रतिबंधित ई सिगारेट, हुक्का फ्लेवरची विक्री

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 10, 2026
Spread the love

पुणे : विमाननगर परिसरातील निको गार्डन येथील स्मोक हेवन शॉपमध्ये प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या चालकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली असून, दुकानातून १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दुकान मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद फाईज फारुख शेख (वय २२, रा. स्पर्श व्हिला, बालेवाडी, पुणे; मूळ रा. चारला, जि. कासारगोड, केरळ) असे आहे. तर दुकानाचा मालक मोहम्मद शरीफ (रा. स्पर्श व्हिला, बालेवाडी, पुणे; मूळ रा. मंगळुरू, कर्नाटक) याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल किसन जोशी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस अंमलदार लालु कहे यांना विमाननगरमधील निको गार्डन येथील स्मोक हेवन शॉपमध्ये बेकायदेशीररीत्या ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी ८ जून रोजी सायंकाळी दुकानावर छापा टाकला.

कारवाईदरम्यान दुकानात उपस्थित असलेल्या मोहम्मद शेख याला ताब्यात घेण्यात आले. दुकानाची झडती घेतली असता १ लाख ५७ हजार रुपयांचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई-सिगारेट तसेच संबंधित साहित्य आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव व पोलीस निरीक्षक महेश बोलके यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तसेच पोलीस अंमलदार लालु कहे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोम्पे, प्रशांत सुतार, आशा धादवड आणि सना शेख यांनी केली.