आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

किडझी प्री स्कूलमध्ये फुलांच्या वर्षावात चिमुकल्यांचे स्वागत

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 10, 2026
Spread the love

बार्शी : आलकनंदा एज्युकेशनल ट्रस्ट संचलित किडझी प्री स्कूल, बार्शी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी आणि सिनियर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले.

शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांवर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाळेतील शिक्षिकांनी स्वतः तयार केलेली आकर्षक हस्तनिर्मित (क्राफ्ट) फुले विद्यार्थ्यांच्या हातात देत त्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रेमळ आणि अनोख्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस अविस्मरणीय ठरला.

पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमधील भीती व संकोच दूर व्हावा यासाठी शिक्षिकांनी त्यांच्याशी संवाद साधून आपुलकीचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे चिमुकल्यांनीही आनंदाने शाळेत प्रवेश करत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली. शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि आनंदी वातावरणाने फुलून गेला होता.

या स्वागत सोहळ्याने पालकांचाही उत्साह वाढला. अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या शाळेतील पहिल्या दिवसाच्या स्वागताचे फोटो व व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपले. तसेच व्हॉट्सॲप स्टेटस आणि विविध सोशल मीडिया माध्यमांवर ते शेअर करून आनंद व्यक्त केला. आपल्या मुलांचे इतक्या प्रेमाने स्वागत होत असल्याचे पाहून पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या पहिल्या शालेय दिवसाची आठवण कायम राहावी यासाठी शाळेत ‘My First Day of School’ ही विशेष थीम साकारण्यात आली होती. रंगीबेरंगी इंद्रधनुष्याच्या आकर्षक सजावटीसमोर विद्यार्थ्यांचे समूह छायाचित्र घेण्यात आले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता.

विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, शिक्षणाची सुरुवात आनंददायी वातावरणात व्हावी आणि शाळेची गोड आठवण त्यांच्या मनात कायम राहावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अल्का उज्ज्वल सोमाणी व प्राचार्या शिल्पा खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका गायत्री काबरा, वर्षा शिराळ, श्रद्धा ताटे, चारुशिला साळवी, माधुरी क्षिरसागर, पूजा उंबरदंड व समृद्धी नांदेडकर यांनी स्वागत सोहळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. शाळेच्या या अभिनव उपक्रमामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि संस्मरणीय वातावरणात झाली.