आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डिलिव्हरी बॉयला लुटणाऱ्या सराईत गुंडांना अटक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 10, 2026
Spread the love

पुणे : रात्री-अपरात्री डिलिव्हरी देण्यासाठी जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयचे जगणे आता अधिक जिकिरीचे होत चालले आहे. रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या एका तरुणाच्या खिशातील रोकड व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रकार समोर आला आहे. मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाई झालेल्या दोघा सराईत गुंडांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

केतन शाम टेमकर (वय २३) आणि खुशाल ऊर्फ दादया शिंदे (वय २४, दोघे रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

याप्रकरणी अनिकेत हरिदास लोहार (वय २४, रा. खोपडेनगर, गुजरवाडी, कात्रज) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ८ जून रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास अप्पर बिबवेवाडी येथील राजीव गांधीनगर परिसरात घडली.

अनिकेत लोहार हे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. अप्पर बिबवेवाडीतील राजीव गांधीनगर येथील राजगड चाळ परिसरात ते डिलिव्हरी देण्यासाठी गेले होते.

त्यावेळी केतन टेमकर व खुशाल शिंदे यांनी त्यांना अडवले. त्यांच्या खिशातील ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच त्यांच्याकडील मोबाईलही हिसकावून घेतला.

त्यानंतर केतन टेमकर हा त्यांच्या दुचाकीवर बसला. “आरडाओरडा करू नकोस, नाहीतर तुझे काम तमाम करू,” अशी धमकी देत त्यांना दोन-तीन गल्ल्यांमध्ये फिरवून अखेरीस “चल, निघून जा,” असे म्हणत हाकलून दिले.

यानंतर अनिकेत लोहार यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

त्यामध्ये हे दोघे संशयित दिसून आले. पोलिसांनी परिसरातील गल्ल्यांमध्ये शोधमोहीम राबवून काही तासांतच दोघांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे करीत आहेत.