आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

स्पा सेंटरच्या आड सुरू होता जुगाराचा अड्डा : १० जण अटकेत

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 10, 2026
Spread the love

बार्शी : बार्शी तालुका पोलिसांनी स्पा मसाज सेंटरच्या आड सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १० जणांना अटक केली असून रोख रक्कम, जुगार साहित्य व वाहने असा एकूण १२ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून जुगार, मटका, गुटखा, हातभट्टी, अवैध दारू निर्मिती व विक्री तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांवर सातत्याने धडक कारवाई सुरू आहे.

बुधवारी (दि. १०) रात्री गस्तीदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, बार्शी-लातूर बायपास रोडवरील नागोबाचीवाडी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील ‘लक्झरी डिलक्स स्पा मसाज सेंटर’मध्ये काही व्यक्ती जुगार अड्डा चालवत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथकासह छापा टाकला असता तेथे १० जण पैशांची पैज लावून ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

या कारवाईत रोख रक्कम, जुगार साहित्य तसेच वाहने असा एकूण १२,३१,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात हा जुगार अड्डा आकाश काशिद व स्पा सेंटरचा व्यवस्थापक बाबू चौधरी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक व इतर संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश बिरकले, महंमदगौस महेदी व चालक पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण चिट्टलवाड यांनी पार पाडली.