एनएसईचे सीईओ आशिष चौहान यांना ‘सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड’
सूर्यदत्त ग्रुपतर्फे सन्मान : भारतातील गुंतवणूक संस्कृती लोकाभिमुख करण्यात मोलाचे योगदान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान यांना भारतातील आधुनिक भांडवली बाजारपेठ आणि वित्तीय व्यवस्थेच्या उभारणीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे ‘सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड – द फादर ऑफ मॉडर्न फायनान्शियल डेरिव्हेटिव्ह्ज इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील एनएसईच्या मुख्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या हस्ते आशिष चौहान यांना मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सल्लागार मंडळाच्या सदस्या ॲड. गीता कस्तुरी, निर्माता डॉ. मयूर शहा, प्रसिद्ध फॅशन डिझायनर संदेश नवलखा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी चौहान यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, भारतातील गुंतवणूक संस्कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि लाखो गुंतवणूकदारांना सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे.
त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने बळ मिळाले आहे. आशिष चौहान हे वित्तीय बाजारातील नवकल्पना, डिजिटल परिवर्तन, गुंतवणूकदार जनजागृती आणि शाश्वत विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांनी बीएसई लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही यशस्वी नेतृत्व करत संस्थेच्या आधुनिकीकरणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
भारतातील आधुनिक वित्तीय डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठेचे जनक म्हणून ओळखले जाणारे आशिष चौहान हे आयआयटी मुंबई आणि आयआयएम कोलकाता येथील माजी विद्यार्थी आहेत.
१९९० च्या दशकात स्थापन झालेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील पहिली पूर्णपणे संगणकीकृत आणि स्क्रीन-आधारित इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्रणाली विकसित करण्यात आली.
या प्रणालीमुळे भारतीय शेअर बाजारात पारदर्शकता, कार्यक्षमता, सुलभता आणि विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढली. इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि अत्याधुनिक जोखीम व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यातही चौहान यांचे मोठे योगदान आहे.
त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून देश जगातील प्रमुख डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग केंद्रांपैकी एक म्हणून उदयास आला आहे.
यामुळे बाजारातील तरलता, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि वित्तीय समावेशनाला मोठी चालना मिळाल्याचे प्रा. डॉ. चोरडिया यांनी नमूद केले.
