सराईत गुंडाचा सुतारदऱ्यात निर्घृण खून
दिवाळीच्या पूर्वसंध्येची घटना : कोथरुड पोलिसांनी तिघांना केली अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : एकाच वस्तीत राहत असताना नेहमी त्रास देत असल्याच्या कारणावरून तिघांनी सराईत गुन्हेगारावर तलवार आणि कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
लाल्या ऊर्फ प्रकाश शांताराम येवले (वय २८, रा. सुतारदरा, कोथरूड) असे खून झालेल्याचे नाव आहे. विकी प्रमोद मोरे (वय २६, रा. सुतारदरा), अनिकेत ऊर्फ दत्तात्रय ऊर्फ अंड्या संजय मालपोटे (वय २१, रा. दत्तवाडी, सुतारदरा) आणि अक्षय किसन साठे (वय ३०, रा. भूगाव, मूळ रा. सुतारदरा, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अभिषेक विभीषण घारे (वय १९, रा. श्रावणधरा सोसायटी, कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सुतारदरा येथील शिवसाम्राज्य सार्वजनिक गणेश मंडळाजवळ शनिवारी, ७ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता घडली होती.
लाल्या ऊर्फ प्रकाश येवले हा सराईत गुन्हेगार होता. खानापूर परिसरातील सीआर बॉईज या टोळीचा तो सदस्य होता. त्याच्यासह टोळीतील २२ जणांविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तो पाच महिने फरार होता.
आरोपी आणि प्रकाश येवले हे एकाच वस्तीत राहणारे आहेत. प्रकाश येवले हा आरोपींना येता-जाता शिवीगाळ करून, ‘बघून घेतो’, असे म्हणून दमदाटी करत असे. त्यांच्याशी भांडणही करत असे.
अभिषेक घारे, प्रकाश येवले आणि त्यांचा मित्र हे शनिवारी रात्री पावणे नऊ वाजता चहा पिण्यासाठी दुचाकीवरून जात होते. शिवसाम्राज्य मंडळाजवळ प्रकाश येवले याने आरोपींना आवाज देऊन शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपींनी त्यांची मोटारसायकल ओढली. त्यामुळे ते खाली पडले.
आरोपींकडे शस्त्रे होती. ती पाहून आरोपी आपल्याला आता मारतील, असे वाटल्याने विकी मोरे याने त्याच्याकडील कोयत्याने घारे याच्या तळहातावर वार करून त्याला जखमी केले. त्यानंतर त्याने प्रकाश येवले याच्या तोंडावर आणि डोक्यात वार केले. त्यावेळी घारे याने त्याच्या हातातील लोखंडी हत्यार आरोपींकडे फेकून मारले. अक्षय साठे याने तेच हत्यार घेऊन प्रकाश येवले याच्यावर वार केले. अनिकेत मालपोटे याने सिमेंटचा ब्लॉक प्रकाश येवले याच्या छातीवर मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक सुनील कारोटे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. प्रकाश येवले याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
पोलिसांनी शोध घेऊन शनिवारी रात्रीच विकी मोरे आणि अनिकेत मालपोटे यांना अटक केली होती. त्यानंतर रविवारी रात्री अक्षय साठे याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सुनील कारोटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
