गॅस बिल अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर फसवणूक
महिला व तरुणाला साडेआठ लाखांचा गंडा : एरंडवणे आणि मुंढवा परिसरातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गॅस बिल अद्ययावत करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेसह दोन जणांची तब्बल ८ लाख ६० हजार रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अलंकार आणि मुंढवा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
एरंडवणे परिसरातील हिमाली सोसायटीत राहणाऱ्या ४९ वर्षीय महिलेची ४ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
३० मे रोजी गॅस कंपनीच्या नावाने पाठविण्यात आलेल्या संदेशाद्वारे बिल अपडेट न केल्यास गॅस पुरवठा बंद होईल, अशी भीती दाखविण्यात आली.
त्यानंतर पाठविण्यात आलेली बनावट एपीके फाईल डाउनलोड केल्यानंतर चोरट्यांनी तिच्या बँक खात्यातून रक्कम परस्पर काढून घेतली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम करीत आहेत.
“गॅस बिल, केवायसी किंवा अपडेटच्या नावाखाली येणाऱ्या लिंक अथवा एपीके फाईल डाउनलोड करू नका. कोणतीही माहिती देण्यापूर्वी संबंधित कंपनीशी थेट संपर्क साधून खात्री करा,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जास्त बिलाची तक्रार पडली महागात – केशवनगर येथील ३६ वर्षीय तरुणालाही अशाच पद्धतीने गंडा घालण्यात आला. एमएनजीएल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून चोरट्यांनी ‘गॅस बिल अपडेट’ नावाची एपीके फाईल पाठवली आणि १३ रुपये सेवा शुल्क भरण्यास सांगितले. त्यानंतर त्याच्या क्रेडिट कार्डमधून ३ लाख ६३ हजार ५९३ रुपये वळते करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सागर गोडे करीत आहेत.
