आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विवाह निमंत्रण पत्रिका उघडणे पडले महागात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 15, 2026
Spread the love

पुणे : अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पाठविण्यात आलेल्या विवाह निमंत्रण पत्रिकेची लिंक उघडणे एका व्यावसायिकाला महागात पडले. सायबर चोरट्यांनी त्याच्या बँक खात्यातून ५ लाख ३० हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली.

याबाबत ५६ वर्षीय व्यावसायिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक असून ते ताडीवाला रोड परिसरात राहतात. त्यांना ९ मे २०२६ रोजी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून विवाह निमंत्रण पत्रिकेची लिंक पाठविण्यात आली होती. त्यांनी ती लिंक उघडली.

त्यानंतर एक दिवसाने मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर “रघुनंदन कुमार अ‍ॅमेझॉन फ्रॉड” असा संदेश आला. त्या संदेशाच्या माध्यमातून सायबर चोरट्याने त्यांच्याकडून ओटीपी मिळवला. अनेक प्रकरणांमध्ये ओटीपी मिळाल्यानंतर तातडीने संबंधिताच्या बँक खात्यातून रक्कम काढली जाते.

मात्र, फिर्यादी यांच्या खात्यातून दुसऱ्या दिवशी ५ लाख ३० हजार रुपये काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करीत आहेत. अनोळखी क्रमांकावरून पाठविण्यात आलेले संदेश अथवा एपीके फाईल उघडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.