तहसीलदारांची बनावट सही करून फसवणुकीचा प्रयत्न
शेतजमिनीच्या फाळणी बाराचा अंमल घेण्याचा प्रयत्न : तहसीलदार कोलते पाटील यांची वाघोलीत फिर्याद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दुसऱ्या मिळकतीसाठी दिलेल्या पत्राचा जावक क्रमांक वापरून केसनंद येथील शेतजमिनीच्या फाळणी बाराचा अंमल गाव दप्तरी घेण्यासंबंधीच्या कागदपत्रांमध्ये चक्क तहसीलदारांच्या आदेशाची खोटी व बनावट सही-शिक्क्याचे पत्र तयार करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्राम महसूल अधिकाऱ्यांना तहसीलदारांच्या सही-शिक्क्याने आलेल्या कागदपत्रांबाबत संशय आल्याने हा प्रकार समोर आला.
याबाबत तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील (वय ४५) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अरुण दत्तात्रय गायकवाड (रा. मोशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार केसनंद ग्राम महसूल कार्यालयात २५ मे २०२६ पूर्वी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्ती कोलते-पाटील या २०२४ पासून तहसीलदार म्हणून कार्यरत असून पूर्व हवेली तालुक्यातील अपर तहसीलदार कार्यालयांतर्गत येणाऱ्या ४४ गावांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. केसनंद ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून त्यांना एक पत्र व त्यासोबत काही कागदपत्रे प्राप्त झाली होती. त्यामध्ये केसनंद येथील गट क्रमांक १७२ या मिळकतीच्या फाळणी बाराचा व दुरुस्ती गटबुकाचा गावाच्या अधिकार अभिलेखात अंमल देण्याबाबत अर्जदाराने तलाठी कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची विनंती करण्यात आली होती.
ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांवरील तहसीलदारांच्या सहीबाबत संशय आल्याने त्यांनी शहानिशा करण्यासाठी ती कागदपत्रे पाठविली होती. पडताळणीदरम्यान संबंधित पत्र तहसीलदार कार्यालयाकडून हवेली तालुक्यातील शिरसवडी येथील गट क्रमांक ४० या मिळकतीबाबत ग्राम महसूल अधिकारी, शिरसवडी यांना देण्यात आल्याचे हक्क नोंद संकलनातून दिसून आले.
तसेच पत्रावरील तृप्ती कोलते-पाटील यांची सही बनावट असल्याचे निष्पन्न झाले. बनावट पत्रामध्ये ‘तहसीलदार हवेली’ असे पदनाम नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात त्या ‘तहसीलदार, लोणी काळभोर’ म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांचे आदेशही बनावट असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करून खातरजमा केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रांची पडताळणी केली असता, अकृषिक परवानगीच्या एस.आर. रजिस्टरमध्ये केवळ एस.आर. क्रमांक ७२ पर्यंतच नोंदी असल्याचे आढळले. २०२५ च्या एस.आर. रजिस्टरमध्ये ८९/२०२५ अशी कोणतीही नोंद नव्हती. तसेच केसनंद येथील गट क्रमांक १७२ पैकी १० हजार चौरस मीटर क्षेत्रासाठी कोणतेही पत्र अथवा आदेश देण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट झाले.
यावरून केसनंद ग्राम महसूल कार्यालयात सादर करण्यात आलेले पत्र बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून तयार करण्यात आले असून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आहिरे करीत आहेत.
बनावट कागदपत्र बनविणारी टोळी
शासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या व शिक्के तयार करून, इतर कामांसाठी वापरलेल्या पत्रांच्या जावक क्रमांकांचा गैरवापर करत बनावट आदेशपत्रे तयार करणारी एखादी टोळी कार्यरत असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारे बनावट सही, शिक्के व आदेश तयार करून नागरिकांची फसवणूक करणारी साखळी अस्तित्वात असण्याची दाट शक्यता असल्याचे तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
